संकटकाळी हेल्पलाइनची मदत; रेल्वे प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:23 PM2021-02-20T23:23:08+5:302021-02-20T23:23:26+5:30
रेल्वे प्रवाशांना दिलासा : गुन्ह्यांमध्येही काहीशी घट
सुनील घरत
पारोळ : रेल्वे प्रवासात प्रवाशांवर येणाऱ्या संकटकालीन माहितीसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे हेल्पलाइन सुरू केली. आता हा हेल्पलाइन नंबर संकटकाळी रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा ठरू लागला आहे.
प्रवासात अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी, संभाव्य गुन्ह्यांना रोखण्यासाठी, प्रवाशांतील भांडणांवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे गाड्यांमध्ये घडणारे गुन्हेही काही प्रमाणात घटले आहेत.
बाका प्रसंग आल्यावर अनेकांना पोलिसांची मदत आवश्यक असते. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यावर तक्रार करताच तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रवास करीत आहात तेथील जवळील पोलीस तक्रारदाराच्या नंबरवर संपर्क करून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात.
रेल्वेस्थानकात असलेल्या पोलीस ठाण्यातून चांगला अनुभव आला नसल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी कंट्रोल रूम अथवा हेल्पलाइनला संपर्क करावा. त्यामुळे हे कॉल रेकॉर्ड होतात तसेच त्यानंतर प्रवाशांना थेट मदत मिळवून देणे सोपे होते. त्यासाठी प्रवास अर्धवट सोडण्याची गरज नसते. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी स्वतः प्रत्येक कॉलवर लक्ष ठेवून असल्याने तक्रारीचा कॉल आल्यानंतर मदत पोचली किंवा नाही याची माहिती अधीक्षक घेत असतात.
त्यामुळे तक्रारदाराला मदत लवकर पोहोचू शकते; तसेच प्रत्येक मार्गावर २४ तास सुरू असलेल्या गस्तीपथकालादेखील याची माहिती दिली जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील पोलिसांसह ही टीमदेखील तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करते. प्रवासादरम्यान पाकीट मारणे, बॅगेतून दागिने-पैसे लुटून नेणे, चालत्या रेल्वेतून खिडकीत बसलेल्यांचे दागिने हिसकावणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. पाकीट व मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना तर सर्रास घडतात.