- संदीप जाधवमहाड : आपल्या पतीने देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे आमच्या कुटुंबास अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्यामुळेच कुटुंबाला डोंगराएवढ्या दु:खातून सावरण्याची खरी हिंमत आणि ऊर्जा मिळाली, असे उद्गार शहीद नामदेव पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी काढले.कारगील येथील सरहद्दीवर शत्रूशी लढताना २१ सप्टेंबर १९९९ रोजी धारातिर्थी पडलेले महाड तालुक्यातील धामणे गावचे सुपुत्र लान्सनायक नामदेव पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. शहीद नामदेव यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. आज १९ वर्षांनंतर हे कुटुंब दु:खातून सावरले असले, तरी मोठ्या हिमतीने वीरपत्नी सुजाताने कुटुंबाला सावरले आहे.कारगीलमध्ये पाच पॅरारेजिमेंटमध्ये कार्यरत असताना सरहद्दीवर शत्रूशी लढताना आपल्या अनेक सहकाऱ्यांचे नामदेव पवार यांनी प्राण वाचवले. मात्र, स्वत: नामदेव यांना दुर्दैवाने हौतात्म्य पत्करावे लागले.पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलींची जबाबदारी सुजाता यांच्यावर होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुजाता यांनी आपल्या तिन्ही मुलींना उत्तम शिक्षण दिले. मोठी मुलगी संजू ही फार्मसी पदवीधर असून, दुसरी मुलगी बबली ही सातारा येथे इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे, तर तिसरी मुलगी पूनम ही महाडमध्ये डॉ आंबेडकर महाविद्यालयात सायन्सला तिसºया वर्षात शिकत आहे. बबली हिला एसएससीमध्ये ९३ टक्के गुण मिळाले होते.धामणे गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाºया या पहिल्याच तिघी बहिणी आहेत. मुलींनी शिकून खूप मोठे व्हावे, ही आपल्या पतीची इच्छा होती. मात्र, सध्या मुलींना शिक्षण देताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पतीच्या निधनानंतर आपल्याला अनेक सामाजिक संघटनांनी सहकार्य केले. महाड पंचायत समितीने धामणे गावात उपलब्ध करून दिलेल्या भूखंडावर महाड उत्पादक संघटनेने मोफत घर बांधून दिले आहे.घराशेजारीच शहीद नामदेव पवार यांचे पवार कुटुंबीयांनी स्मारक उभारले आहे. शासनाकडून मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान मिळाल्यास आर्थिक विवंचना कमी होईल, अशी अपेक्षा वीरपत्नी सुजाता पवार यांनी व्यक्त केली.
त्यांच्या शौर्यानेच दु:खातून सावरण्याची हिंमत मिळाली, कारगील युद्धातील शहीद नामदेव पवार यांच्या पत्नीचे भावनिक उद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 3:57 AM