लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर पनवेल: गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गौरी मातेचे शनिवारी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. गणपतीसह गौरी मातेच्या आगमनासह आरास सजावट तसेच तयारी केली जाते.या गौराईमातेला भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले.
ग्रामीण भागात गावातील तलाव तसेच नदीपात्रात गणपती गौराईचे विसर्जन करण्यात आले.तर शहरी भागात पालिकेने 78 ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारले आहेत तर 59 ठिकाणी नैसर्गिक कुत्रिम तलाव उभारले आहेत.सायंकाळी 5 वाजेपर्यंत पालिका क्षेत्रात 2020 आणि तालुक्यातील ग्रामीण भागात 3200 अशी पाच हजारापेक्षा जास्त गणपती आणि गौराईचे निसर्जन करण्यात आले.शनिवारी विसर्जनाच्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने विसर्जन घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात आल्या.
गणेश विसर्जनाला भाविकांनी नदी, तलावांच्या ठिकाणी न जात आपल्या प्रभागातच महापालिकेच्या मूर्तीदान करावे हा उपक्रम पालिकेने यावर्षी राबविला असुन या उपक्रमाला चांगला प्रतिवाद मिळताना दिसुन येत आहे.रात्री उशिरा पर्यंत मुर्त्यांची विसर्जन सुरूच होते.महत्वाच्या विसर्जन घाटांवर पोलीस बंदोबस्त तसेच अग्निशमन दलातील जवान देखील बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते.आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार,डॉ वैभव विधाते आणि इतर कर्मचारी स्वतः विसर्जन घाटांवर भेटी देत विसर्जन घाटांच्या परिस्थितीचा आढावा घेत होते.