जयंत धुळपअलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरतीचे खारे पाणी माचेला, चीर्बी, खारघाट, जांभेळा, ढोंबी, खारपाले, म्हैसबाड, देवळी, जुई अब्बास, आनंद नगर या तब्बल दहा गावांतील सुमारे २३०० एकरांत भातशेतीमध्ये घुसले. यामुळे १३०० शेतकरी कुटुंबांच्या हातातोंडाशी आलेल्या नव्या भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ही शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती साकव ग्रामविकास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पूर्वीच्या निप्पॅन डेन्रो इस्पात तर आताच्या जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीने आपल्या प्रकल्प विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात जमीन भूसंपादन केली आहे. हे करताना पर्यावरणाचा व बाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता, येथील पूर्वपार असणारे पाणी वाहून जाण्याचे मार्ग मातीचा भराव करून बुजविले आहेत. त्यामुळे भरती आणि ओहटीचे प्रवाह त्याचबरोबर पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून येणारे पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने खारढोंबी, माचेला येथे समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) व जुई अब्बास गावाच्या दोन उघाड्या पूर्णपणे फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे हे खारे पाणी घुसून शेतात कापून ठेवलेले भात वाहून जावून मोठे नुकसान झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीने केलेल्या या भरावामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि धोक्याच्या छायेत आलेली शेकडो एकर भातशेती या संदर्भात पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कार्यालयासमोर गेल्या २३ मे २०१७ रोजी या सर्व गावांतील शेतकºयांचे उपोषण आंदोलन झाले होते. त्यावेळी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकरी, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी व पेण तहसीलदार अजय पाटणे यांची संयुक्त बैठक होऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे व फुटलेले बांध (खांडी)बांधून देण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला दिले होते. परंतु उप विभागीय महसूल अधिकाºयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पंचनामे व फुटलेले बांध (खांडी) बांधून देण्याच्या कामाची अंमलबजावणी कंपनीकडून झाली नाही. अखेर उधाणाचे खारे पाणी धरमतर खाडीमधून येवून तयार व कापून ठेवलेल्या भात शेतीत घुसून हा कटू प्रसंग शेतकºयांवर ओढवला आहे.अन्यथा शेतकºयांना भातशेतीऐवजी मीठ पिकवावे लागेल१तुटलेले बाहेरकाठे जर लवकर बांधले नाही तर याच फुटलेल्या बांधांचे आकारमान वाढत राहील व दिवसेंदिवस खारे पाणी अधिक प्रमाणात भातशेतीत घुसण्याची प्रक्रि या सतत घडत राहून शेतकºयांना भातशेतीऐवजी मीठ पिकवावे लागेल, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे शिवकर यांनी स्पष्ट करुन, बाहेरकाठे युद्धपातळीवर बांधून देण्याची नैतिक जबाबदारी शासनाची असून या कामाकरिता खारभूमी खात्याला विशेष निधी उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.२२३ मे २०१७ रोजी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व कंपनीच्या वतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सामाजिक भावनेने हे काम केले पाहिजे. अन्यथा भूसंपादनासाठी माती भराव करून उभारलेल्या कारखान्याला गडगंज नफा होईल व शेतकरी मात्र उद्ध्वस्त होईल याचा कंपनीने व शासनाने विचार करावा, असे आवाहन बाधित शेतकºयांच्या वतीने त्यांनी केले आहे.पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेशसामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे आणि खारपाले-जोळे, जुई-अब्बास-जोळे पंचक्र ोशी शेतकरी मंडळ यांनी या संदर्भात पेण उप विभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व पेण तहसीलदार अजय पाटणे व खारभूमी विकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी करावी अशी मागणी केली.त्यास अनुसरुन बुधवारी खारभूमी विकास खात्याच्या उप अभियंता सोनल गायकवाड, शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व शाखा अभियंता दीपक आजगावकर व खारपाले, गडाब, जुई येथील शेतकरी लक्ष्मण केणी, माणिक गावंड, हरिश्चंद्र तांडेल, काका म्हात्रे व जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी यांनी धरमतर खाडी मार्गे बोटीने जाऊन प्रत्यक्ष समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटलेल्या ठिकाणांची पाहणी केली.पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ देण्यात आले आहेत. दोन दिवसांत पंचनामे करण्याचे काम होईल, त्यावेळी नेमक्या नुकसानीची परिस्थिती स्पष्ट होईल. पंचनामे प्राप्त होताच अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.
उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:22 AM