रसायनी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका २१ फेब्रुवारीला होत असून, सध्या तालुक्यात अधिकृत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात पाहवयास मिळत आहे. वडगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडीच्या उमेदवार पद्मा सुरेश पाटील, वासांबे गटातून राष्ट्रवादीच्या उमा मुंढे, तसेच सावरोली पंचायत समिती गणातून विश्वनाथ शंकर पाटील, तर वडगाव पंचायत समिती गणातून चंद्रकांत तुकाराम कातकरी, वासांबेतून पंचायत समितीसाठी वृषाली ज्ञानेश्वर पाटील, चांभार्लीतून कांचन पारंगे हे निवडणूक लढवित आहेत. उमेदवार प्रचारासाठी नागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर देत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून प्रचाराचा झंझावात पाहवयास मिळत आहे. मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी दहा दिवस असताना या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची ओळख निर्माण व्हावी, त्याचबरोबर आपली निशाणी दाखविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या उद्देशाने गावे, वाड्या तसेच दुर्गम भागातील प्रचारावरही उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत उमेदवारांकडून प्रचार रॅली काढण्यात येत असून घोषणापत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. (वार्ताहर)
उमेदवारांचा मतदारांच्या भेटीगाठींवर भर
By admin | Published: February 12, 2017 3:15 AM