अलिबाग : आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील भात लावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये चारसूत्री भात लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
पारंपरिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन मिळत नाही, अशी ओरड कायमच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसूत्री लागवड पद्धत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषी सहायकांनी गावागावात जाऊन चारसूत्री भात लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा एंट्री मारली आहे. त्यामुळे भात लावणीची कामेदेखील लांबणीवर गेली आहेत. आठ ते दहा दिवस लावणीची कामे उशिरा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे; परंतु आठवडाभर पाऊस सुरू असल्याने सखल भागामध्ये पाणी साचले व शेतही पाण्याने भरून गेले आहे.
८०० हून अधिक हेक्टरवर चारसूत्री लागवड
पारंपरिक भात लावणीपेक्षा शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे फायदे होत आहेत. या पद्धतीत कमी रोप लागते, शिवाय खर्चही कमी येतो. मजूरवर्ग कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती केली आहे. कृषी सहायकांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८०० हून अधिक हेक्टरवर चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
या लागवडीतून मजुरीच्या खर्चाची बचत होण्याबरोबर वेळही वाचला जात आहे. त्यामुळे ही पद्धत चांगली आहे, असा विश्वास आहे. चारसूत्री लागवड करताना स्वतः कृषी विभागाचे अधिकारी शेतावर असतात, असं प्रगतिशील शेतकरीप्रदीप गुरव म्हणाले.