पश्चिमेला जोर ओसरला; पूर्वेकडे मात्र बरसू लागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:09 PM2020-09-11T13:09:28+5:302020-09-11T13:11:53+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता.
जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी दमदार पाऊस झाला होता. यामध्ये ऊस, बाजरी, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला आहे. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले.
साताऱ्यासह पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस होत आहे. तर पश्चिमेकडे मात्र, पावसाचा जोर नाही. तुरळक स्वरुपात पाऊस हजेरी लावत आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा १ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ४२२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे सकाळपर्यंत १ आणि जूनपासून ४८२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २१ आणि यावर्षी आतापर्यंत ४८१४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.६३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.