कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, शिक्षक, कर्मचा-यांच्या कामबंदचा दहावा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:03 AM2018-03-15T03:03:20+5:302018-03-15T03:03:20+5:30
चांदई आणि डिकसळ येथे असलेल्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
कर्जत : तालुक्यातील चांदई आणि डिकसळ येथे असलेल्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ८० टक्के कामगारांनी सुरू केलेले कामबंद आणि असहकार आंदोलन दहाव्या दिवशी देखील सुरूच आहे.
थकीत पगार सरस्वती एज्युकेशन ट्रस्टने देण्याच्या मागणीसाठी चांदई येथील तासगावकर महाविद्यालयाच्या कामगार वर्गाने ५ मार्चपासून असहकार आंदोलन पुकारले. संस्थेच्या सात महाविद्यालयातील ८०० हून अधिक कर्मचाºयांनी कामबंद आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखविली होती. तासगावकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी व्यवस्थापन कामगार कोर्टात गेले आणि तेथे कामबंद आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र न्यायालयाने कामगारांची बाजू ऐकून घेताना कोणताही निर्णय दिला नाही, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कर्जत पोलिसांच्या १०० मीटर हद्दीच्या मर्यादेनंतर १३ मार्च रोजी कामगारांनी आंदोलन महाविद्यालयाबाहेर सुरू ठेवले. कामगार कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी दुपारी सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी कामगारांनी आंदोलन पुकारत आहेत, तेथे येऊन मार्च अखेरपर्यंत कामगारांचे सर्व थकीत पगार देण्याची तयारी दाखवली. मात्र यापूर्वीचे दोन्ही अनुभव लक्षात घेऊन कामगारांनी संस्थेच्या मार्चपर्यंत सर्व पगार देण्याच्या आश्वासनावर आक्षेप घेतला.
संस्थेमध्ये ८०० हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करीत असून कामगार कायद्यानुसार अनेक समस्यांना कामगारांना सामोरे जावे लागत आहे. त्यात शिक्षक वर्गाचे मागील १८-१९ महिन्यांचे पगार थकले आहेत, तर कर्मचारी वर्गाचे ८-१० महिन्यांचे पगार थकले आहेत.
२०१३ नंतर संस्थेकडून कामगारांच्या पीएफची रक्कम भरली गेली नाही. कामगार कायद्यानुसार कामगारांचे कर कपातीसाठी आवश्यक असलेला फॉर्म १६ संस्थेकडून भरण्यात आला नाही.
या मागण्यांसाठी सरस्वती एज्युकेशन ट्रस्टच्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरूच राहील असा निर्धार केला.
ंआम्ही शनिवारी कामगार कोर्टात हजर झालो, मात्र कामगारांच्या हाती काही मिळत नसल्याने सर्व कामगारांना विश्वासात घेऊन आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही. आमच्या अन्य मागण्यांप्रमाणे पूर्ण वेतन मिळावे अशी प्रमुख मागणी आहे. संस्था आम्हाला १४० टक्के वेतन देण्याऐवजी ४०-७० टक्के वेतन देऊन आमचे आर्थिक नुकसान करीत आहे.
-अविनाश भासे, कामगार प्रतिनिधी