सीईओकडून कामगारांना शिवीगाळ, डीपी वर्ल्डमधील प्रकार : न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:18 AM2017-10-12T02:18:24+5:302017-10-12T02:18:39+5:30
दिवाळी सणासाठी देण्यात येणाºया सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजारांपर्यंत वाढविण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ करून दालनातून हुसकावून
उरण : दिवाळी सणासाठी देण्यात येणाºया सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजारांपर्यंत वाढविण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ करून दालनातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एनएसआयसीटी कामगार संघटनेच्या कामगारांनी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे संतप्त कामगार आणि मुजोर प्रशासन यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जेएनपीटीअंतर्गत एक बंदर एनएसआयसीटी या खासगी बहुराष्टÑीय कंपनीला दिले आहे. त्यानंतर हेच बंदर एनएसआयसीटीने डीपी वर्ल्ड म्हणजे दुबई पोर्टला चालविण्यास दिले आहे. या दुबई पोर्टमधून वर्षाकाठी सुमारे १३ लाख कंटेनरची हाताळणी केली जाते. या खासगी बंदराला जोडून अतिरिक्त ३३० मीटर लांबीची जेट्टी उभारण्यात आली असून, दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या नव्या एक्स्टेंशन बंदरातूनही वर्षाकाठी साडेचार ते पाच लाख कंटेनर हाताळणी केली जात आहे.
प्रचंड नफ्यात असलेल्या या दुबई पोर्ट (डीपी वर्ल्ड) बंदरात सध्या २८२ कामगार काम करीत आहेत. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामगारांना कंपनीकडून देण्यात येणाºया सानुग्रह अनुदान रकमेकडे लक्ष लागून राहिले आहे. दरवर्षी कामगारांना १७ हजार ६०० रुपयांना अनुदान दिले जात होते. यावर्षी सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी कामगारांनी केली आहे. मात्र, बंदराची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून देण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे. दिवाळी बोनसची आणि वाढीव सानुग्रहाच्या रकमेच्या प्रतीक्षेत असलेले काही कामगार चौकशी करण्यासाठी मंगळवारी (१० आॅक्टोबर) दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांच्या दालनात गेले होते.
सीईओच्या दालनात चौकशी करण्यास गेलेल्या कामगारांना बोनस, वाढीव अनुदानाच्या रकमेऐवजी सीईओ रविंदरसिंग जोहल यांच्या अश्लील शिवीगाळ आणि अपशब्दांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याची पाळी आली. इतक्यावर न थांबता त्यांनी दालनातून कामगारांना हाकलून देण्याचाही प्रयत्न केला. आम्ही बोनस आणि वाढीव सानुग्रह अनुदानाच्या चौकशीसाठी आलो असून आमच्या प्रतिनिधींशी चर्चा का करीत नाही? कामगारांना समर्पक कारणे का देत नाही, अशी विचारणाही कामगारांनी सीईओकडे केली. मात्र, सीईओ जोहल यांनी कामगारांना शिवीगाळ करून उर्मट भाषेत निरुत्तर करीत कामगारांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच चोळल्याची संतप्त भावना कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांच्याविरोधात न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी लेखी तक्रारही दाखल केली
आहे.
यासंदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता कामगारांशी झालेल्या वादाबद्दल सीईओने कामगारांसमक्ष दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कामगार आणि प्रशासनातील वाद संपुष्टात आला आहे. दरवर्षी देण्यात येणाºया ८.३३ टक्के बोनस कामगारांच्या खात्यावर जमा होणार असून, वाढीव सानुग्रह अनुदानाच्या रकमेबाबतही येत्या सोमवारपर्यंत निर्णय होईल, अशी माहिती दुबई पोर्टचे एचआरओ संजीवन कोकणे यांनी दिली
आहे.
कामगारांना दिवाळीसाठी देण्यात येणाºया बोनस, वाढीव सानुग्रह अनुदानाच्या रकमेऐवजी सीईओकडून शिव्याची लाखोली आणि अपशब्दाचा मार मिळाल्याने कामगारवर्गात सध्या संतापाचे वातावरण पसरले आहे. यामुळे दिवाळी सणापूर्वीच कामगार आणि प्रशासन यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली
आहे.