- आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा यंदाचा दिवाळी सण धूमधडाक्यात साजरा होणार आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार त्यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करुन फेस्टिव्हल अॅडव्हान्सची रक्कम आता १० हजार रुपये केली आहे. गेल्या वर्षी फेस्टिव्हल अॅडव्हान्सची रक्कम ही पाच हजार रुपये होती. सुमारे १० कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा फेस्टिव्हल अॅडव्हान्स त्यांना देण्यात येणार आहे.या फेस्टिव्हल अॅडव्हान्सचा लाभ सुमारे १० हजार ६५८ कर्मचाऱ्यांना होणार आहे. सरकारच्या २० आॅक्टोबर २०१५ च्या निर्णयानुसार ही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना ऋण काढून सण साजरा करावा लागणार नाही. दिवाळी सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी कर्मचाऱ्यांना पगार अधिक बोनस दिला जायचा. त्यामुळे दिवाळीची जोरदार खरेदी केली जायची. कालांतराने बोनस देण्याची प्रथा बंद झाल्याने कमी खर्च करण्यावर भर दिला जात होता.कर्मचाऱ्यांची दिवाळी मजेत आणि आनंदात जाण्यासाठी सरकारने १९६२ ते २०१२ पर्यंत निर्णय घेत त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात वाढ केली आहे. गेल्या वर्षी फेस्टिव्हल अॅडव्हान्सची रक्कम ही पाच हजार रुपये होती. सरकारने २० आॅक्टोबर २०१५ च्या सरकारी निर्णयानुसार त्यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करुन फेस्टिव्हल अॅडव्हान्सची रक्कम आता १० हजार रुपये केली आहे.सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. फेस्टिव्हल अॅडव्हान्स मिळणार असल्याने मोठ्या संख्येने खरेदीची धूम बाजारात दिसून येणार आहे. पगारासोबतच फेस्टिव्हल अॅडव्हान्स मिळणार असल्याने आता खरेदीसाठी हात आखडता घेण्याची गरज नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.- रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे १० हजार ६५८ कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. फेस्टिव्हल अॅडव्हान्सची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून समान हप्त्यामध्ये कापली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता ऋण काढून सण साजरा करण्याची गरज भासणार नाही. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा अॅडव्हान्स हा बिनव्याजी आहे असे जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी (प्रभारी) राजू लाकूडझोडे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांची दिवाळी धडाक्यात
By admin | Published: November 04, 2015 12:54 AM