कर्मचा-यांचे काम बंद, जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:03 AM2017-10-04T02:03:37+5:302017-10-04T02:03:53+5:30
महसूल विभाग आणि पुरवठा विभाग हे दोन्ही भिन्न आहेत. या विभागाचे दोन स्वतंत्र मंत्री, दोन स्वतंत्र सचिव आहेत, परंतु पुरवठा विभागात महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने काम करतात
अलिबाग : महसूल विभाग आणि पुरवठा विभाग हे दोन्ही भिन्न आहेत. या विभागाचे दोन स्वतंत्र मंत्री, दोन स्वतंत्र सचिव आहेत, परंतु पुरवठा विभागात महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने काम करतात. त्यामुळे पुरवठा विभागाने आता आपल्याच विभागात स्वतंत्र कर्मचा-यांची भरती करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे पुरवठा विभागात काम करणाºया महसूल कर्मचा-यांना महसूल विभागात समाविष्ट करणे हा पर्याय आहे, मात्र महसूल विभागात एवढा कर्मचाºयांचे पुनर्वसन कसे होणार याची भीती त्यांना सतावत आहे. या विरोधात त्यांनी मंगळवारी जिल्ह्यामध्ये एक दिवसाचे काम बंद आंदोलन छेडले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुरवठा विभागात सुरुवातीपासूनच कारकून स्तरावरची भरती झाली नाही. त्यामुळे त्या विभागात महसूलच्या कर्मचाºयांचा भरणा केला गेला. ही बाब आता मंत्रालयीन स्तरावर पुन्हा एकदा जाणवू लागली आहे. त्यानुसार पुरवठा विभागाने पुरवठा विभागात स्वतंत्र भरती प्रक्रिया करण्याला सुरुवात केली आहे. याची सुरुवात विदर्भापासून आधीच झाली आहे. ते लोण आता विविध कोकण विभागात शिरकाव करण्याच्या स्थितीमध्ये आहे. याचा निषेध म्हणून रायगडच्या जिल्हा पुरवठा विभागाने कामबंद आंदोलन केले. त्यामध्ये १५ तालुक्यातील पुरवठा विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला.
जिल्हा पुरवठा विभागात जिल्हा पुरवठा अधिकारी यांची एक जागा मंजूर आहे, ती जागा भरलेली आहे. नायब तहसीलदार आणि तहसीलदार वर्गाच्या प्रत्येकी एक-एक जागा मंजूर असल्या तरी त्या दोन्ही जागा रिक्त आहेत. अव्वल कारकूनच्या ५८ मंजूर जागांपैकी पाच पदे रिक्त, लिपिकच्या ५२ पैकी सात जागा रिक्त आहेत. पुरवठा निरीक्षकाच्या आठ जागांपैकी तीन रिक्त आहेत. पुरवठा विभागाने आधी रिक्त असणाºया जागा भरण्याबाबत विचार सुरु केला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे यांनी सांगितले.