कर्मचाऱ्यांनी भागविली वाड्यांची तहान
By admin | Published: March 30, 2017 06:49 AM2017-03-30T06:49:40+5:302017-03-30T06:49:40+5:30
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी उन्हातान्हात
नेरळ : कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी उन्हातान्हात डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करीत दोन ते तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एलआयसी कंपनीच्या कर्मचारी संघटनेने दोन आदिवासी वाड्यांत पाण्याचे टँकर सुरू केल्याने आदिवासी बांधवांची तहान भागली आहे.
कर्जत तालुक्यातील बांगरवाडी ही आदिवासीवाडी खांडस ग्रामपंचायतीत येत असून, खांडस येथील पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असताना तलावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडीतील विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे ४५ घरांची वस्ती असलेल्या त्या वाडीतील आदिवासी महिलांना खांडस गावाला जाणाऱ्या डांबरी रस्त्याने डोक्यावर हंडे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. अगदी ५० मीटरवर मुबलक पाणी असलेल्या ताडवाडी परिसरात असलेल्या आदिवासी लोकांच्या घरातील हंड्यात पाणी नाही. पाण्यासाठी त्या वाडीतील महिला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारे गावाकडील नाल्यावर पोहचतात. तेथील महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून एप्रिल महिना सुरू होण्याअगोदर ही स्थिती निर्माण झाल्याने आदिवासी भागातील महिलांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेली काही वर्षे आयुर्विमा महामंडळाचे कर्मचारी ठाणे येथील कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी पाणीटंचाईग्रस्त भागात आदिवासींची तहान भागविण्याचे प्रयत्न करत आहेत. यावर्षी या भागातील ताडवाडी आणि बांगरवाडीमध्ये पिण्याचे पाणी देण्यासाठी टँकर सुरू केले आहेत. त्यासाठी संघटनेचे अध्यक्ष दिनकर बच्छाव, सचिव राजेश गायकवाड, नेरळचे उपसरपंच पप्पू शेळके, कोषाध्यक्ष भास्कर भोईर यांनी प्रत्यक्ष जाऊन टँकर सुरू केले. ठाणे येथील राजेश गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहेत. (वार्ताहर)