जिल्ह्यात लावणीच्या कामातून आदिवासींना रोजगार
By निखिल म्हात्रे | Published: July 6, 2024 02:11 PM2024-07-06T14:11:12+5:302024-07-06T14:11:42+5:30
गावात मजूर मिळत नसल्याने आदिवासी बांधवांना मागणी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये भात लावणीला सुरुवात झाली आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला लावणीच्या कामातून चांगला रोजगार मिळत आहे. जुलै अखेरपर्यंत त्यांना काम मिळणार आहे.
आदिवासी समाजातील काही मंडळी पाऊस संपल्यावर वीटभट्टीवर कामाला जातात. त्यातून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यानंतर पावसाळ्यात शेतीची कामे करतात, तर काहीजण डोंगरावर उताराच्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करतात. रायगड जिल्ह्यामध्ये ९८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड केली जाणार आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा चांगला पाऊस पडत असल्याने भात लावणीची कामे एकाचवेळी सुरू झाली आहेत. त्यामुळे गावात मजूर मिळत नसल्याने आदिवासी बांधवांना मागणी वाढली आहे.
भात लावणीला सुरुवात झाली आहे. रोपे लावणीसाठी कामगार म्हणून आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रियांना मागणी आहे. वेगवेगळ्या भागातून ही मंडळी लावणीच्या कामासाठी येतात. त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही दिला जातो.
- सतीश म्हात्रे, शेतकरी