पेण : देशातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी कायदे करून भांडवलदारांचे हित जोपासले आहे. सर्वसमान्यांना यापुढे अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत उत्तम प्रकारे काम करीत आहे. जनहिताचे अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकडे आघाडी सरकारने लक्ष आहे. स्थानिक नागरिकांना प्रामुख्याने रोजगाराची हमी हेच सरकारचे प्राधान्यक्रम राहिले, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पेण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात केले.
पेण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खणीकर्म पर्यटन क्रीडा फळोत्पादन युवक कल्याण माहिती जनसंपर्क व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड हे उपस्थित होते.
या वेळी तटकरे यांनी मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी कायद्यावर हल्ला चढवला. सामान्य कामगार यामुळे देशोधडीला लागणार आहे. भांडवलधार्जिणे सरकार असेच या केंद्र सरकारचे धोरण आहे. पेणमधील गणेशमूर्तिकारांचा व्यवसाय व प्लास्टर आॅफ पॅरिसपासून गणेशमूर्ती बनवू नये, पीओपीवर घातलेली बंदी, याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न संसदेच्या सभागृहात उपस्थित करून समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. याबरोबर पेण अर्बन सहकारी बँकेबाबत संसदेत ठेवीदारांचे हित रक्षण कायदा उपस्थित झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत याही प्रश्नावर बोलताना या सहकारी बँकेबाबत एका चांगल्या बँकेमध्ये विलीनीकरण करावे, असेही खासदार म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले. पक्ष संघटनेच्या सर्व पातळ्यांवर पक्षाच्या सर्व सेलवर नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजूट होऊन काम करावे. सर्वसामान्यांची कामे, प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आगामी काळात झटले पाहिजे. रायगडात राष्ट्रवादी काँगेस पक्ष एक नंबरचा बनेल, असे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आघाडी सरकार रोजगारनिर्मितीसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून स्वयंरोजगार निर्मितीसाठी फिरत्या विक्री केंद्रासाठी अनेक वस्तू व पदार्थांची विक्री करून रोजगारनिर्मिती करता येईल. या सरकारी योजनांचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.