पेणमधील आदिवासी महिलांना काजूगरातून मिळतोय रोजगार
By admin | Published: April 12, 2016 12:57 AM2016-04-12T00:57:16+5:302016-04-12T00:57:16+5:30
कोकणचा मेवा सर्वांनीच खावा, शुद्ध, पौष्टिक, बलवर्धक व आरोग्यदायी हा रानमेवा चैत्रापासून सुरू होतो. तो आषाढ मासापर्यंत याची लज्जत सामान्यांची रुची भागविते. आंबा, काजू, फणस, कोकम
पेण : कोकणचा मेवा सर्वांनीच खावा, शुद्ध, पौष्टिक, बलवर्धक व आरोग्यदायी हा रानमेवा चैत्रापासून सुरू होतो. तो आषाढ मासापर्यंत याची लज्जत सामान्यांची रुची भागविते. आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद, जांभूळ व अन्य डोंगराळ फळांचा बहर ही चैत्र पालवीची हमखास नैसर्गिक देण आहे. सध्या बाजारात ओल्या काजूगराला मोठी मागणी आहे. यामुळे आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
कोकणच्या भूमीवर काजूच्या झाडांची विपुलता आहे. या काजूगराची मागणी हॉटेल व्यावसायिकसुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. मात्र आदिवासी महिलांचा रोख पेणच्या सकाळ, सायंकाळच्या बाजारावरच असतो. दररोज ३० ते ३५ आदिवासी महिला छोट्या टोपल्यात काजूगर बिया घेवून मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसतात. धारदार विळ्याने बिया कापून त्यातील अर्धे अर्धे ओले काजूगर १५ ते २० नग याप्रमाणे हिरव्या पानावर काजूगराचा वाटा मांडून विक्रीसाठी ठेवतात. प्रत्येकी ३५ ते ४० रुपये दराने त्यांची विक्री होते. दिवसाकाठी एक आदिवासी महिला या ओल्या काजूगर विक्रीतून सुमारे ८०० ते १००० रुपयांची विक्री करते. अशा प्रकारे ३० ते ३५ या महिला तीन ते चार महिन्यांसाठी ओल्या काजूगरातून चांगली आर्थिक कमाई होत असते. सध्या कोकणचा डोंगराळ रानमेवा बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध होत असून यामध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवणामध्ये ओल्या काजूगराचा समावेश मोठ्या प्रमाणात करण्यावर भर असतो. रानमेवा शारीरिक धनसंपदेस बळ देणारा व बौद्धिक क्षमता वाढविणारा असल्याने ओल्या काजूगराचा छोटासा वाटा ग्राहकांकडून हमखास खरेदी केला जात आहे. हेच कोकणच्या प्राकृतिक संपदेचे वैशिष्ट्य आहे. (वार्ताहर)