प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी
By admin | Published: March 31, 2017 06:22 AM2017-03-31T06:22:44+5:302017-03-31T06:22:44+5:30
तलवारी आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून उरण तालुक्यातील सारडे गावातील चंद्रकांत कमळाकर पाटील आणि
अलिबाग : तलवारी आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून उरण तालुक्यातील सारडे गावातील चंद्रकांत कमळाकर पाटील आणि अनिल कमळाकर पाटील या दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरवून याच गावातील आरोपी हेमंत पाटील, राजेंद्र पाटील, अजित पाटील व रवींद्र पाटील यांना येथील रायगड जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी सुनावली आहे.
आरोपी हेमंत पाटील व अजित पाटील या दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तर राजेंद्र पाटील व रवींद्र पाटील या दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. गावातील रस्त्याच्या बांधकामाच्या निमित्ताने शेतजमिनीच्या अतिक्रमणावरून वाद झाला. १९ मे २००८ रोजी रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यावर आरोपींनी हा प्राणघातक सशस्त्र हल्ला केला होता. तपास करून उरण पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.आर.पेठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आठ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरल्याचे अभियोग पक्षातर्फे न्यायालयात काम पाहणारे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)