माथेरान : दोन दशकांपूर्वी शहरात वास्तव्यास असलेले पारसी बांधव आपले बंगले विकून अन्यत्र स्थायिक झाले. त्यामुळे या ठिकाणी नवनवीन हॉटेल सुरू झाले आहेत. मात्र हॉटेलधारकांना व्यवसायास जागा अपुरी पडू लागल्याने त्यांनी आजूबाजूला असलेल्या वनखात्याच्या जागेवर अतिक्रमणे करून ताबा मिळवला आहे. तर काही ठिकाणी वनखात्याच्या अखत्यारीतील मोठमोठे भूखंडही हॉटेल व्यावसायिकांकडून गिळंकृत केले जात आहेत. याबाबत वनसंरक्षक समितीचेही दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.वनखात्याच्या जागांची व्याप्ती करताना अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. काहींनी तर या जागांवर ‘ही जागा वनखात्याच्या मालकीची असून इथे सुशोभीकरणासाठी वापर करीत आहोत’ या आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. हॉटेल्सधारकांकडून या जागांवर प्लास्टिक टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. तर कुणी पाळणे लावून पर्यटकांना, मुलांना खेळण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी झाडांची बेसुमार कत्तल करून जागा व्यापल्या जात आहेत.एकीकडे मोठमोठ्या हॉटेल्स अणि बंगलेधारकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाला वनखात्याकडून अभय देण्यात येत आहे, तर दुसरीकडे पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असणाऱ्या ऐतिहासिक पॉइंट्सवरील छोट्या छोट्या स्टॉल्सधारक टपऱ्यांवर कारवाईचा हातोडा उगारला जातआहे. त्यामुळे वनविभागाकडून दुय्यम भूमिका घेतली जात असल्याचाआरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वनखात्याच्या जमिनींंवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:35 PM