पनवेल: रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे आपण ऐकतो आणि बोलतो.या रक्तदानाचा अनोखा महायज्ञ तेवत ठेवत पनवेल मधील आदई गावातील रहिवासी गणेश सीताराम भोपी (47) यांनी अनोखा विक्रम केला आहे.एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 125 वेळा रक्तदान करून भोपी यांनी समाजसेवाच वेगळा वसा जोपासला आहे.
ओ पॉसिटीव्ह रक्तगट असलेले गणेश भोपी यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून रक्तदानाला सुरुवात केली. आजवर त्यांनी रुग्णालयात गरजवंतांना, रक्तदान शिबीर, अपघातातील अत्यावश्यक वेळेला भरलेल्या गरजेच्या वेळेला रक्तदान केले आहे. 151 वेळा रक्तदान करण्याचा निर्धार भोपी यांनी केला आहे. मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय करणारे भोपी हे शेतकरी आहेत. शेतीत काम करण्याचा त्यांचा छंद आहे. विशेष म्हणजे ओ पॉझिटिव्ह हा सर्वात सामान्य रक्त प्रकार आहे. ओ पॉझिटिव्ह रक्त गट असणारा व्यक्ती ए पॉसिटीव्ह, ओ पॉसिटीव्ह, बी पॉसिटीव्ह आणि आणि एबी पॉसिटीव्ह हे रक्त गट असणाऱ्या व्यक्तींना रक्त देवू शकतात. त्यामुळे ओ पॉसिटीव्ह रक्तगटाचे मागणी अधिक आहे. कोविड काळानंतर वैश्विक स्तरावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी आरोग्य यंत्रणेने नागरिकांना रक्तदानाचे अवाहन केले होते.
गणेश भोपी सारखे जागरूक नागरिक याकरिता पुढाकार घेत आहेत. साधारणतः तीन महिन्याचे अंतर ठेवून पुढचा रक्तदान करण्याचा नियम आहे. मात्र आणेल वेळेला अत्यावश्यक गरज लक्षात घेता मी 41 दिवसाच्या अंतरात देखील रक्तदान केल्याचा गणेश भोपी सांगतात. परमेश्वराने दिलेल्या जीवन सार्थक लावावा या हेतूने मी रक्तदान करीत असतो. आयुष्यात जोपर्यंत मला हि सेवा करता येईल तो पर्यंत मी रक्तदान करणार असल्याचे भोपी यांनी सांगितले.
आजवर केलेल्या रक्तदानाचे प्रशस्तीपत्रक मी माझ्याकडे जोपासुन ठेवले आहेत. अनोळखी व्यक्तींना रक्तदान केल्यानंतर त्या व्यक्तींची भावना खरोखरच वेगळी असते. अनेक जण माझ्या या मदतीचे आभार म्हणुन माझे पाय पकडतात. मात्र मला त्याची आवश्यकता वाटत नाही. मी माझे कर्तव्य करत असतो असे भोपी सांगतात. भोपी यांच्या कुटुंबात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पनवेल मधील आदई गावातील ते रहिवासी आहेत.
मी निस्वार्थपणे माझे कर्तव्य करतो. 125 वेळा रक्तदान मी आजवर पूर्ण केले आहे. 151 वेळा रक्तदान करण्याचा माझा निर्धार आहे. शरीराने साथ दिल्यास परमेश्वराचा आशीर्वाद राहिला तर आयुष्यभर मी रक्दानाचा महायज्ञ सुरूच ठेवेन, असं गणेश सिताराम भोपी यावेळी म्हणाले.