पेण : शिकण्यासाठी माध्यम महत्त्वाचे नाही. कोणत्याही भाषेतून शिक्षण घ्या, शालेय शिक्षण घेत असताना हळूहळू इंग्रजी भाषा आत्मसात करा आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा, उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी महत्त्वाची भाषा ठरते. जगाचे सर्व व्यवहार इंग्रजी भाषेतून चालत असल्याने शिक्षणातून करियर घडविताना देश अथवा विदेशात भाषेची अडचण भासणार नाही. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडणे ही काळाची गरज असून राष्ट्राच्या भावी पिढीला विज्ञान संगणकीय जगतात डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषाही तेवढ्याच ताकदीने आत्मसात करावी, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी मनीष कुमार यांनी पेण-हमरापूर येथील अक्षर विद्यालयातील कार्यक्रमा वेळी केले.
पेण-हमरापूर येथील अक्षर विद्यालयात नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी म्हणाले, पर्यावरण प्रदूषण वाढल्यामुळे मनुष्याला विविध आजारांनी ग्रासले आहे. म्हणून लवकरच जिल्ह्यातील ३५ वर्षांवरील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणार म्हणजे पुढील उपचार वेळीच करता येतील. असे सांगून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, पालकांनी, शिक्षकांनी मोबाइलसोबत संवाद कमी केला तर विद्यार्थ्यांशी जास्त संवाद होईल. त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन योग्य दिशा मिळेल, असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक मनीष कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, पेण तहसीलदार डॉ. अरुणा जाधव, गटविकास अधिकारी सी. पी. पाटील आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा सत्कारच्याप्रसंगी दहावीत उत्तीर्ण विद्यार्थी मनीष पाटील (प्रथम), भूषण चव्हाण (द्वितीय), श्रुती पाटील (द्वितीय), मृदुला ठाकूर (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला.