लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड लाचलुचपत विभागातर्फे गेल्या दीड वर्षांपासून माझी आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. हवी असलेली सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही चौकशीला मी हजर राहणार नाही, जी काय कारवाई आपल्याला करायची आहे ती करा, असे आज मी लाचलुचपत अधिकारी यांना सांगितल्याचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बुधवारी लाचलुचपत कार्यालयात साळवी यांच्या कुटुंबीयांची एक तास चौकशी झाली. त्यानंतर साळवी हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, असे म्हणाले.
एक तास चौकशी
- राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना बुधवारी २७ डिसेंबर रोजी रायगड लाचलुचपत विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. लाचलुचपत कार्यालयात हजर राहण्यासाठी साळवी कुटुंबीयांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार आमदार राजन साळवी, भाऊ दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी हे अलिबाग लाचलुचपत कार्यालयात चौकशीला हजर झाले.
- वहिनी अनुराधा दीपक साळवी या आजारपणामुळे गैरहजर राहिल्या होत्या. यावेळी साळवी कुटुंबाच्या वाहनांबाबत तसेच इतर कागदपत्रे यांची माहिती विभागाने घेतली. एक तास चौकशी केल्यानंतर साळवी कुटुंब हे कार्यालयाबाहेर पडले.