उरण बाजारपेठेत रानभाज्या दाखल; मागणी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:13 AM2020-06-18T01:13:40+5:302020-06-18T01:13:44+5:30
ग्राहकांअभावी आदिवासींवर उपासमारीची वेळ
- मधुकर ठाकूर
उरण : कोरोना महामारीच्या संकटातच उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, परंतु या रानभाज्यांकडे ग्राहकांनीच पाठ फिरविल्याने, ऐन मोसमातच आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर आणि जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवू लागतात. या रानभाज्या विकून आदिवासी आपली उपजीविका करतात. सध्या बाजारात कुल्लू, शेवाळी, अंबाडी, कंदमुळे, कुर्डू, टाकळा, भोकरं, वाघेटा, कंटोळा आदी प्रकारांतील रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळी हंगामात डोंगर, जंगलात नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या आणि उगवलेल्या या रानभाज्या औषधी व आरोग्याला अत्यंत गुणकारी असतातच. शिवाय रुचकर, स्वादिष्ट असतात. त्यामुळे फक्त पावसाळी हंगामातच मिळणाऱ्या या रानभाज्या बाजारात येण्याची प्रतीक्षा खवय्यांना नेहमीच असते.
उरणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या रानभाज्या दाखल झाल्या आहेत. आदिवासी महिला या रानभाज्या विक्रीसाठी शहरात घेऊन येतात मात्र, कोरोनाच्या भीतीने उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्यांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. यामुळे ऐन हंगामातच रानभाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
या आदिवासींचा या रानभाज्यांवरच या हंगामात उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा कोरोनामुळे रानमेव्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न थांबले, त्याचबरोबर आता रानभाज्यांची ही विक्री होत नसल्याने आदिवासी हवालदिल झाले
आहेत.