राज्यातील एकमेव आणि एेतिहासिक कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 02:48 PM2018-01-21T14:48:52+5:302018-01-21T14:49:24+5:30
अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता अरबी सागरात भक्तांचा जनसागरच लाेटला असल्याचे चित्र रविवारी पहाटे पाच वाजल्या पासून दिसत हाेते.
- जयंत धुळप
अलिबाग - अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता अरबी सागरात भक्तांचा जनसागरच लाेटला असल्याचे चित्र रविवारी पहाटे पाच वाजल्या पासून दिसत हाेते. राज्यातील या एकमेव गणेशपंचायतनाच्या दर्शनाकरीता माघी गणेशाेत्सवात राज्यातील विविध जिल्ह्यातून गणेशभक्त मुळातच माेठ्या प्रमाणात येत असतात, त्यातच यंदा हा गणेशाेत्सव पवित्र अशा २१ तारखेलाच अनेक वर्षानंतर आला आणि रविवारी असल्याने यंदा पर्यटकांचा देखील यामध्ये माेठा सहभाग दिसून येत असल्याची माहिती कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते अॅड.सागर पाटील यांनी किल्ल्यात लाेकमतशी बाेलताना दिली आहे.
कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे गणेशाेत्सवाचे सुरेख आयोजन केले होते. नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे गणेश पंचायतन असल्याची मोठी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनाकरिता आले होते. नवस फेडण्याकरिता भाविकांनी शनिवारी रात्रीच किल्ल्यात मुक्कामास येवून पहाटे पाच वाजता महापूजा झाल्यावर गणेश पंचायतनचे दर्शन घेवून आपले नवस फेडले.
कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अलिबाग शहरातील दानशूरांच्या सहयोगातून येथे दरवर्षी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद (भोजन) देण्याचा उपक्रम करते. कोळी समाज आणि शहरातील सुमारे २५० भाविक हा महाप्रसाद गणेश सेवा या भावनेतून तयार करीत असतात. यंदा ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याची माहिती मंडळाचे सदस्य बाळाराम भगत यांनी दिली.
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आंग्रेकालीन ‘गणेश पंचायतन’ मंदिर अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यात आहे. किल्ल्यातील पोखरणीच्या (तलावाच्या) पश्चिमेस हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी दगडी चौथऱ्यावर उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक गणपती, पुढील बाजूस डावीकडे ‘सांब’ तर उजवीकडे ‘विष्णू’ आणि मागील बाजूस डावीकडे ‘सूर्य’ तर उजवीकडे ‘देवी’ अशा एकूण पाच मूर्तींच्या या समूहास गणेश पंचायतन असे संबोधले जाते. संपूर्ण काळ्या दगडातील हे मंदिर थोरल्या राघोजी आंग्रे यांनी बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी व उजव्या बाजूस गणपतीची प्रतिमा आहे. मंदिराचे सभागृहसुद्धा अष्टकोनी असून येथे आल्यावर भाविकांना एक आगळी शांती प्राप्त होत असल्याचे दर्शनास आलेल्या काही भाविकांनीच सांगितले.
दर्शनाच्यावेळी भावीकांची काेणतीही अडचण हाेवू नये तसेच दर्शन देखील शांतपणे घेता यावे याकरिता भाविकांच्या रांगांकरिता विशेष नियाेजन करण्यात आले आहे. रांगेतून आलेल्या भावीकांना थेट गणेश गाभाऱ्या पर्यंत पाेहाेचून थेट दर्शन घेता येईल तसेच प्रदक्षिणे अंती थेट महाप्रसाद घेण्याकरीता महाप्रसाद मंडपात पाेहाेचता येईल याकरित एका तात्पूर्त्या पूलाची उभारणी करण्यात आली आहे. दर्शनाकरिता मंडळाने केलेल्या या व्यवस्थे बद्दल भावीकांनी समाधान व्यक्त करुन मंडळास धन्यवाद दिले.
उत्सवाच्या निमीत्ताने काेणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी अलिबाग समुद्र किनारी तसेच किल्ल्यात चाेख पाेलीस बंदोबस्त उपलब्ध करुन दिला होता.