महालक्ष्मीच्या सोनपावलांनी बाजारात उत्साह; खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:16 PM2020-12-16T23:16:47+5:302020-12-16T23:16:50+5:30
गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळीनंतर कोरोना महामारी संकटाचा सामना केल्यानंतर आता मोकळा श्वास घेत, बाजारात उत्साहाने खरेदी करण्यासाठी महिला भगिनी उतरल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.
पेण : कोरोनाचे भय दूर सारून मार्गशीर्ष महिन्यांत श्री महालक्ष्मी देवीच्या व्रतोपासनेचा प्रारंभाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सकाळपासून महालक्ष्मीची पूजाविधीचे सामानाची खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळीनंतर कोरोना महामारी संकटाचा सामना केल्यानंतर आता मोकळा श्वास घेत, बाजारात उत्साहाने खरेदी करण्यासाठी महिला भगिनी उतरल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. महालक्ष्मी देवीच्या सोनपावलांनी बाजारात उत्साह जाणवत होता. भाव तिथे देव आणि श्रद्धेला मोल नसते. मातृसत्ताक संस्कृतीचा आदर आपला समाज नेहमीच करतो. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर निवासिनी माता महालक्ष्मी देवीचा वरदहस्त आपल्या राज्यावर आहे.
मार्गशीर्षातील व्रतोपासनेची श्रद्धा भक्तिभाव यातूनच उदयास आला असणार, महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असल्याने प्रत्येक ऋतूत हा भक्तिभाव बहरतो. मार्गशीर्ष महिना याला अपवाद नसावा. बाजारात आज पूजा साहित्य, पंचाअमृत, फळे, फुले, देवीचा साजशृंगार, फायबरचे महालक्ष्मी देवीचे मुखवटे, प्रसादाचे सामान, भाजीपाला यासह किराणा मालाची खरेदी करताना महिलामध्ये बाजारात उत्साह जाणवत होता. आवाक्यात असणारे वस्तू व सामानाचे दर व भाज्यांचे दर घसरल्याने मार्गशीर्षातील उपासनेचा पहिल्या गुरुवारचे समाधान या भक्तिमय वातावरणात दिसून
येत होते.