पर्यावरणपूरक फटाक्यांची ‘एंट्री’; धुराची मर्यादा केलेले फटाके बाजारात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:17 PM2023-11-01T19:17:09+5:302023-11-01T19:17:19+5:30

पर्यावरणपूरक फटाके जरी बाजारात दाखल झाले असले तरी यंदा फटाक्यांची खरेदी रायगडकरांचा खिसा रिकामा करणार आहे.

'Entry' of eco-friendly crackers; Smoke limited crackers are available in the market | पर्यावरणपूरक फटाक्यांची ‘एंट्री’; धुराची मर्यादा केलेले फटाके बाजारात उपलब्ध

पर्यावरणपूरक फटाक्यांची ‘एंट्री’; धुराची मर्यादा केलेले फटाके बाजारात उपलब्ध

अलिबाग : प्रदूषणामुळे फटाक्यांची विक्री घटत असतानाच हा व्यवसाय टिकविण्यासाठी यंदा ‘ग्रीन फायरवर्क’चे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. धूर कमी करणारी फुलबाजी, ‘फॅन्सी’ फटाके, भुईनुळे, भुईचक्र बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून, त्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक फटाके जरी बाजारात दाखल झाले असले तरी यंदा फटाक्यांची खरेदी रायगडकरांचा खिसा रिकामा करणार आहे.

फटाक्यांच्या दरांमध्ये १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर दिवाळी जोरदार साजरी होणार असल्याने शहरात फटाक्यांच्या स्टॉलची संख्याही यंदा वाढली आहे. जिल्ह्यातील परिसरात फटाक्यांचे अनेक स्टॉल्स लागले आहेत. रिटेल आणि होलसेल दरामध्ये फटाके विक्री केली जात आहे. दिवाळी सुरू होण्यासाठी आता १२ दिवसच उरले असल्याने पुढील काही दिवसांमध्ये या गर्दीमध्ये आणखी वाढ होईल, असे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. 

फटाक्यांच्या दरांचा अंदाज घेतला असता नेहमी २५० रुपयांना मिळणारा सुतळी बॉम्बचा बॉक्स तीनशे रुपयांवर जाऊन पोहोचला आहे, तर फुलबाजी, भुईनुळे, भुईचक्र, बाण, लवंगी, लक्ष्मी बॉम्ब, आकाशात उंच उडणारे ‘फॅन्सी’ फटाके यांच्याही किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. या फटाक्यांमध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांना अधिक मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या या फटाक्यांच्या प्रकारांचे उत्पादन यंदा ८० ते ९० टक्क्यांनी वाढले असून, नागरिकांकडूनही या फटाक्यांची मागणी केली जात आहे.

‘आपटी बार’ जोरात चालणार
काही वर्षांपूर्वी छोट्याशा पुडीसारखे दिसणाऱ्या आणि पायात चटकन वाजणाऱ्या आपटी बारवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता उठवण्यात आली असून, आपटी बार खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. याशिवाय सुट्या लवंगीची विक्रीही चांगली होत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.

फटाक्यांच्या किमती कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे यंदा नागरिकांनाही काहीशा वरच्या दरामध्ये फटाके घ्यावे लागतील. दोन वर्षांनंतर फटाक्यांच्या बाजाराने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आता नागरिक चांगली खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे.
- प्रतीक शिंदे, फटाका व्यावसायिक

Web Title: 'Entry' of eco-friendly crackers; Smoke limited crackers are available in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग