रायगडात उमेदवारीसाठी शिवसेना युवा सेनेची एन्ट्री; भरत गोगावले पुत्राचे झळकले फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 06:08 AM2024-03-10T06:08:38+5:302024-03-10T06:09:12+5:30
आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा जागेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेना शिंदे गटातर्फे युवा सेनेने उडी घेतली आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत.
रायगडची जागा लढविण्यास भाजप इच्छुक आहे. केंद्र स्तरावर भाजप नेत्याची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तटकरे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून ‘मीच उमेदवार असेल,’ असे छातीठोकपणे सांगत आहेत.
मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, तर पालकमंत्री उदय सामंत यांनी तटकरे यांनाच उमेदवारी मिळावी, अशी प्रतिक्रिया आधी बोलून दाखवली होती. आता शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाचे महाडमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडची जागा मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे युवा सेनेकडून सांगितले जात आहे.