राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उरणच्या मनोहर फुंडेकर यांच्या 'ऑफ कोर्स' या रहस्यमयी कॉमेडी नाटकाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:45 PM2023-12-04T17:45:58+5:302023-12-04T17:46:41+5:30
'ऑफ कोर्स' या रहस्यमयी कॉमेडी नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक किशोर म्हात्रे यांनी केले आहे.
मधुकर ठाकूर
उरण : २०२३ च्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उरण येथील मनोहर फुंडेकर यांच्या ' ऑफ कोर्स' या रहस्यमयी कॉमेडी नाटकाचा समावेश आहे.हे एक व्यावसायिक नाटक आहे. स्पर्धेसाठी या नाटकाचा प्रारंभिक फेरीचा प्रयोग ठाणे येथे डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दिनांक २८ डिसेंबर रोजी सायं. ७:०० वाजता रंगणार आहे.
या स्पर्धेत केंद्र ठाणे २५, केंद्र नाशिक २८, केंद्र पुणे २३ तसेच महाराष्ट्रतील इतर केंद्रांतून सुमारे २५० ते ३०० नाटकांचा समावेश असणार आहे. यामध्ये उरण येथील मनोहर फुंडेकर यांच्या 'ऑफ कोर्स' या रहस्यमयी कॉमेडी नाटकाचा समावेश आहे.आता पर्यंत मनोहर फुंडेकर यांची मर्यादा, मी फुलराणी, योग तुझा घडावा, आम्ही सगळे शहाणे आदी व्यावसायिक तसेच प्रायोगिक नाटके रंगभूमीवर झळकली आहेत. तसेच आर्या-रवी एन्टरटेन्मेंटने आयोजित केलेल्या २०२२ च्या लघुचित्रपट स्पर्धेत त्यांच्या ' चावी' the key' या लघु चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
'ऑफ कोर्स' या रहस्यमयी कॉमेडी नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक किशोर म्हात्रे यांनी केले आहे. संगीताची धुरा विक्रांत वार्डे यांनी सांभाळली असून नेपथ्य रमेश झोरे यांचे आहे. या नाटकाला शुभम नारंगीकर यांची प्रकाश योजना आहे. या नाटकात गौरांगी शेवडे- पाटील, ऋषीकेश पाटील, अश्रिता बारसे, निखील पाटील, सुजित पाटील आदी कलाकारांच्या समावेश आहे.