- दत्ता म्हात्रेपेण - विकासाच्या नावाखाली पर्यावरण भकास झाल्याचे भयाण वास्तव चित्र सध्या पेण ग्रामीण डोंगर पट्ट्यात पाहावयास मिळत आहे. माती माफियांकडून डोंगरावर व माळरानावरील जमिनीवर खुलेआम दरोडा टाकला जातोय. यातील वैध किती अवैध किती माती उत्खनन केले जात आहे, याचा हिशोब घेणे शासकीय महसुलाच्या दृष्टीने आवश्यक आहे. उत्खननासाठी नाममात्र रॉयल्टी शुल्क भरून त्या परवानगीखाली हजारो ब्रास मातीचे उत्खनन करून उखळ पांढरे करण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे.महसूल यंत्रणेने याबाबत अधिक तपास, माहिती घेऊन या परवानगी व्यतिरिक्त अवैधरीत्या झालेल्या माती उत्खनन करणाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून शासनाचा स्वामित्व धनापोटी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवितात, त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. पेण तालुक्यातील पाबळ खोºयातील कळद जिर्णे व परिसरातील झालेले माती उत्खनन व इतर ठिकाणी झालेल उत्खनन पाहून संबंधित तलाठी सजाच्या कार्यक्षेत्रात हे उत्खनन झाले आहे; त्याची मोजमापे घेऊन संबंधिताकडून दंड आकारणीसह महसूल गोळा करावा, अशी मागणी होत आहे. पेण महसूल विभागाकडून २४ जानेवारीपर्यंत चावडी वाचनाचा धडक कार्यक्रम सुरू आहे.कार्यक्रम असलेल्या गावात, आदिवासी वाड्यांवर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रेलचेल सुरू आहे. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला असून, त्यांनी याबाबत तातडीने दक्षता घेत उत्खनन केलेल्या जागेची मोजमाप घेऊन तसा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. मात्र, यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया करून वसूल करणे नितांत गरजेचे असल्याने विभागीय महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी याबाबत संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करावी. राज्य शासनाच्या महसूल तिजोरीत खडखडाट असताना अवैध माती उत्खनातून शासनाच्या लाखो रुपयांचा कर बुडवून धंदा करणाºयांना वचक बसविण्यासाठी खणीकर्म विभागाने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.रात्रीच्या वेळी मातीची चोरी करण्याचे प्रकारसुद्धा वाढलेत, तर दुसरीकडे या प्रकारच्या अवैध माती उत्खनातून डोंगर, पठार, माळराने ओरबाडून उखळ पांढरे करणा-यांचा धंदा तेजीत आहे.पेणला महामार्गावर रुंदीकरणाचे माती भरावाचे काम सुरू आहे. मौजे कळद येथील माती उत्खननासाठी एक हजार ब्रासचे दोन व दोन हजार ब्रासचे दोन असे सहा हजार ब्रासची रॉयल्टी भरून या कार्यालयातून माती उत्खननासाठी परवानगी घेण्यात आली आहे. मात्र या व्यतिरिक्त अधिक उत्खनन केले असल्यास तसा अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून आल्यावर चौकशी होईल व संबधितावर उचित कारवाई करण्यात येईल.- शशिकांत वाघमारे, विभागीय महसूल कार्यालयाचे सहाय्यक
पेणमध्ये माती माफियांमुळे पर्यावरणास धोका, डोंगर पोखरून उत्खनन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 2:43 AM