पर्यावरण मंत्र्यांची तळोजा सीईटीपीला अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:10 AM2019-06-14T01:10:13+5:302019-06-14T01:10:39+5:30
घोट नदीची पाहणी : मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाचीही माहिती घेतली
कळंबोली : राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरु वारी दुपारी ४ वाजता तळोजा एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाला अचानक भेट दिली. त्यानंतर त्यांनी वादग्रस्त मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा परिसर पाहिला, तसेच प्रदूषित घोट नदीची ही पाहणी केली. पर्यावरण मंत्र्यांच्या अचानक येण्याने अधिकारी वर्गाची धावपळ उडाली होती.
तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रि या करणारा सीईटीपी प्रकल्प हा वादग्रस्त आहे. जुनाट झालेल्या या प्रकल्पातून रासायनिक सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या केली जात नाही. त्यामुळे कासाडी नदी तसेच ज्या ठिकाणी प्रक्रि या झालेले पाणी सोडले जाते तो खाडीचा परिसर प्रदूषित झाला आहे. यामुळे सीईटीपी चे संचालक मंडळ दोनदा बरखास्त करण्यात आले आहे. यासाठी परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी लढा दिला होता. सध्या सीईटीपी प्रकल्पाचे अद्यावतीकरण सुरू आहे. हा प्रकल्प देखरेखीसाठी एमआयडीसीकडे वर्गही करण्यात आला आहे. प्रशासन सांभाळण्यासाठी या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अचानक तळोजा सीईटीपी प्रकल्पाला भेट दिली. एमआयडीसीकडे हा प्रकल्प हस्तांतरित केल्यानंतर नेमका काय बदल झाला, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रि या व्यवस्थित होते की नाही, या सर्व गोष्टींची त्यांनी पाहणी केल्याचे समजते. त्याचबरोबर या ठिकाणच्या पाण्याचे नमुनेसुद्धा तपासणीसाठी घेतले असल्याचीही माहिती पुढे आली आहे.