- जयंत धुळप रायगड- इंडियन स्मूथ-कोटेड ऑटर (Lutrogale perspicillata) स्थानिक भाषेत ऊद नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि नामशेष हाेण्याच्या मार्गावरील पाणमांजराच्या प्रजातीचे अस्तित्व अथक मेहनती अंती शाेधून काढण्यात माणगाव येथील प्राणी व पर्यावरण अभ्यासक शंतनु कुवेसकर यांज यश आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या पात्रात दुर्मीळ व नामशेष होत चाललेले मांसाहारी सस्तन प्राणी वर्गातील ही पाणमांजर प्रजाती असल्याचे शंतनु कुवेसकर यांनी "लाेकमत "शी बाेलताना सांगितले.
International Union for Conservation of Nature(IUCN) च्या रेड लिस्ट प्रमाणे हे प्राणी लुप्त होत चाललेल्या प्रजातींच्या श्रेणी मध्ये येण्याचा उच्च धोका पत्करत आहेत. पाणमांजर हा प्राणी छोटे कळप बनवून नदीमध्ये वावर करतात, नदीमध्ये कोळंबी, खेकडे आणि इतर माश्यांची शिकार करताना दिसून येत असल्याचे निरिक्षण कुवेसकर यांनी सांगितले. काळ नदीत सुमारे 15 ते 16 पाणमांजरांचे अस्तित्व आहे. ही पाणमांजरे पाणमांजरांच्या प्रजातीमध्ये सर्वात मोठी पाणमांजरे असून त्यांचे वजन 7 -11 किलो पर्यंत असू शकते असेही निरिक्षण कुवेसकर यांचे आहे. काळ नदीतील पाणमांजरांच्या अस्तित्वामुळे आता काळ नदीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.