खोरा बंदरातील जेट्टीच्या विकासकामांमध्ये त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:36 AM2018-02-20T01:36:21+5:302018-02-20T01:36:23+5:30
ब्रिटिश राजवटीपासून बोटीने वाहतूक होणारे एकमेव ठिकाण म्हणजे खोरा बंदर. सध्या विविध माध्यमातून खोरा बंदराचा विकास होत आहे, परंतु ही विकासकामे होत असताना
संजय करडे
मुरुड जंजिरा : ब्रिटिश राजवटीपासून बोटीने वाहतूक होणारे एकमेव ठिकाण म्हणजे खोरा बंदर. सध्या विविध माध्यमातून खोरा बंदराचा विकास होत आहे, परंतु ही विकासकामे होत असताना कोणताही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने कामात त्रुटी रहात आहेत.
खोरा बंदरातून मशिन बोटीद्वारे जंजिरा किल्ल्यापर्यंत वाहतूक केली जाते, परंतु ही बोट ओहोटीच्या वेळी खाली जाते. नव्याने बांधण्यात आलेली जेट्टी उंच राहिल्याने बाजूला दुसरी बोट ठेवावी लागत असून तिच्या टपावर वरून खाली उतरावे लागते. त्यामुळे असंख्य पर्यटकांची गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोरा बंदरातील जेट्टीची उंची वाढवली असली तरी पाण्यात जाणारा भाग दूरवर वाढवणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ओहोटीच्या समयी फक्त पाच वाजेपर्यंत वाहतूक होते. त्यानंतर बोट किनाºयावर लावण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बोटी किनारी लागल्या तरी प्रवाशांना चढ-उतार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अशावेळी पडून प्रवाशाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोरा बंदराच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन खर्चही झाला. मात्र संबंधित अधिकाºयाचे दुर्लक्ष आणि योग्य नियोजनाअभावी जेट्टीची बांधणी चुकीची झाली आहे.
ओहोटीच्या समयी नवीन बांधण्यात आलेल्या जेट्टी काहीच उपयोगात येत नाही.त्यामुळे भरतीच्या पाण्याची वाट पाहावी लागते.करोडो रु पयांचा यासाठी विकासनिधी खर्च झाला, परंतु संबंधित अधिकारी कामाच्या वेळी उपस्थित न राहिल्याने कामात त्रुटी राहिलेल्या आहेत. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून नेमलेल्या ठेकेदाराकडून चांगले काम करून घ्यावे, अशी मागणी असंख्य पर्यटकांनी केली आहे.