खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:19 AM2018-10-28T04:19:49+5:302018-10-28T04:20:04+5:30

१४३ वर्षांची ‘खातनईची उघाडी’ गायब; रोजगार हमी योजनेतून नवी उघाडी बांधण्याकरिता महिला गावकीचा प्रस्ताव

Error in layout of Kharland area | खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

Next

- जयंत धुळप 

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर गावातील धाकटा पाडा येथील ‘खातनईची उघाडी’च्या झडपा (दरवाजे) उधाणाच्या भरतीमुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्यामुळे गावातील ३३६ शेतकऱ्यांची १४९ हेक्टर भातशेती खाºया पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
जानेवारी २०१८ मध्ये शहापूरमधील शेतकरी महिलांनी तब्बल ८० हजार रुपये खर्च करून श्रमदानातून या ‘खातनईची उघाडी’च्या झडपा दुरुस्त करून भातशेती वाचवली. मात्र, खारलॅन्ड विभागाच्या शासकीय आराखड्यातून १८५० मध्ये केलेली तब्बल १४३ वर्षांची जुनी ‘खातनईची उघाडी’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.
शासनाच्या आराखड्यात ‘खातनईची उघाडी’चा समावेश नसल्याने त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी निधी देता येणार नसल्याचे खारलॅन्ड विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या शेतकरी शिष्टमंडळास सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली. या वेळी महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या एप्रिल २०१४ मधील राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनेत ‘खातनईची उघाडी’सहच्या समुद्र संरक्षक बंधाºयाचा समावेश आहे. खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण महाराष्ट्र खारभूमी कायद्यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ‘कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण-रायगड, यांनी मौजे धाकटापाडा शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील खारभूमी विकास योजना तयार केली आहे. १८५० पासून पेझारी-धाकटे शहापूर असा मूळ समुद्र संरक्षक बंधारा होता. त्यामध्ये या खातनईच्या उघाडीचा समावेश होता. कालांतराने १९७५ मध्ये याच संरक्षक बंधाºयावरून पेझारी-धाकटे शहापूर हा रस्ता करण्यात आला. त्या वेळी खातनईच्या उघाडीच्या वर पूल बांधण्यात आला. मात्र, उघाडी तशीच राहिल्याचे धाकटे शहापूरचे ज्येष्ठ शेतकरी भास्कर रोहिदास पाटील यांनी सांगितले.

भातशेती नापीक करण्याचा आरोप
खातनईची उघाडी सुस्थितीत असेल, तरच गावातील ३३६ शेतकºयांच्या १४९ हेक्टर भातशेतीचे खाºया पाण्यापासून रक्षण होईल. भात पिकास कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, असा योजनेचा मूूळ हेतू असून, आता नेमकी हीच ‘खातनईची उघाडी’ खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने आराखड्यातून कागदोपत्री गायब केल्याने १४९ हेक्टर भातशेती नापीक करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

नवी उघाडी बांधण्याच्या महिला गावकीच्या प्रस्तावास ग्रामसभेत मंजुरी
शहापूर ग्रामस्थांच्या जीवनमरणाशी निगडित खातनईच्या उघाडीऐवजी नवीन उघाडी बांधण्याकरिता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग निधी देऊ शकत नसल्याने आता रोजगार हमीतून ही नवी उघाडी बांधण्याचा प्रस्ताव महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा भास्कर पाटील यांनी ग्रामसभेत मांडला. त्यास ग्रामसभेने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव अलिबाग पंचायत समितीकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Error in layout of Kharland area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड