जयंत धुळप
अलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे(पनवेल) ते इंदापूर या टप्प्यातील सन २०१० पासून सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे काम योग्य प्रकारे झाले नसल्याचे, तसेच झालेल्या कामात अनेक त्रुटी असल्याची लेखी कबुली भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे माहिती अधिकारी प्रशांत जे. फेगडे यांनी दिली. रायगड जिल्हा न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. रायगड जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाच्या खड्डेमय रस्त्यांविरोधात लढाई लढत असलेले सामाजिक कार्यकर्ते, तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. अजय उपाध्ये यांनी गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाच्या पळस्पे (पनवेल) ते पोलादपूर या टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या बाबतची माहिती, १६ जुलै २०१८ पासून माहिती अधिकारांतर्गत भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे अर्ज दाखल करून केली होती. त्यास भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे माहिती अधिकारी प्रशांत जे. फेगडे यांनी २३ आॅक्टोबर २०१८ रोजी लेखी स्वरूपात माहिती देताना ही कबुली दिली आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्ग एनएच-६६ च्या सन २०१० ते २०१८ दरम्यान झालेल्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत माहिती मागविली असता, नागोठणे ते खारपाडा या ४० कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे माहिती अधिकारी प्रशांत जे. फेगडे यांनी मान्य केले. या खड्ड्यांना भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण जबाबदार नसून, या टप्प्याचे काम करणारी सुप्रीम पनवेल-इंदापूर टोलवेज प्रा.लि. कंपनी जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.उत्तरे देणे टाळलेसन २०१० ते २०१८ या कालावधीत महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर झालेला खर्च, कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आलेला निधी आदी आर्थिक बाबींबाबत कोणतीही माहिती प्राधिकरणाने दिलेली नाही. त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरे टाळण्याचे काम प्राधिकरणाने केल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. अजय उपाध्ये यांनी सांगितले.अहवालातून गंभीर बाबी उघडभारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, आपल्या कंत्राटदार कंपन्यांनी केलेल्या कामांचे विशेष निरीक्षण पथकाद्वारे निरीक्षण करून घेते. या निरीक्षण पथकांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला दिलेल्या निरीक्षण अहवालातूनही अनेक गंभीर बाबी समोर आल्या असल्याचे अजय उपाध्ये यांनी लेखी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. वरिष्ठ महामार्ग अभियंता तथा विशेष निरीक्षण पथक प्रमुख जी. पी. गंगाधरन यांच्या पथकाने ‘पनवेल ते इंदापूर’ दरम्यान महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा निरीक्षण अहवाल प्राधिकरणास सादर केला. १६ जून २०१४ रोजी संपलेल्या बांधकामाचा हा निरीक्षण अहवाल आहे.‘क्रॅश बॅरियर्स’ आणि ‘हनिकोंबिंग’च्या त्रुटीपनवेल ते इंदापूर महामार्ग टप्प्यात अनधिकृतरीत्या ट्रक व अवजड वाहनांचे पार्किंग केल्याने महामार्गाचे काम सुयोग्य प्रकारे होऊ शकले नसल्याचा पहिला निष्कर्ष नमूद करण्यात आला आहे. पळस्पे येथील महामार्गाच्या सुरक्षाभिंतीचे (रिटेनिंग वॉल) काँक्रीट फिनिशिंग योग्य व अपेक्षित प्रकारे नाही, असा दुसरा निष्कर्ष आहे. महामार्गावरील संभाव्य अपघात टाळण्याकरिता ‘क्रॅश बॅरियर्स’ मुळातच महामार्गाला समांतर नाहीत, असा तिसरा निष्कर्ष आहे. काँक्रीटीकरणात अनेक ठिकाणी ‘भोकांच्या जाळ्या’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असा चौथा निष्क र्ष आहे. तर महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची प्रगती अत्यल्प असल्याचा पाचवा आणि गंभीर निष्कर्ष आहे.प्राधिकरणाच्या पत्रांना अक्षतानागोठणे ते खारपाडा दरम्यानचे हे खड्डे तत्काळ भरून महामार्गाचा हा टप्पा वाहतुकीकरिता सुरक्षित करावा, याकरिता भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने ९ मे २०१८ आणि १२ जुलै २०१८ अशी दोन लेखी पत्रे कंत्राटदार कंपनीस दिली आहेत. तर २५ एप्रिल २०१८ रोजी सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. आणि त्यांची उप कंपनी योगमा इंजिनीअरिंग कंपनी लि. या दोन्ही कंपन्यांना लेखी पत्रे देण्यात आली आहेत. मात्र, त्यानंतरही कामात सुधारणा दिसून आली नसल्याचे फेगडे यांनी म्हटले आहे.