अलिबाग : बुद्धिबळ खेळात तरबेज असताना अभ्यासात मात्र कमी असल्याने नैराश्य येऊन सुसाईड करण्याच्या उद्देशाने घर सोडून गेलेली अलिबागची अपेक्षा मारभळ (वय १३ वर्ष) हिला अलिबाग पोलिसांनी त्वरित यंत्रणा लावून तिचा शोध घेऊन सुखरूप आपल्या पालकांच्या स्वाधीन केली आहे. आई-वडीलासह व तिच्या शाळेतील वर्ग शिक्षिका यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन या घटनेच्या अनुषंगाने तिचे व त्यांचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगितले.
अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यानगर येथे योगिता अरुण मारभळ हे कुटुंब राहत आहे. अपेक्षा मारभळ ही त्याची मुलगी असून बुद्धिबळ खेळात ती तरबेज आहे. मात्र अभ्यासात तिची प्रगती खूपच कमी असल्याने शिक्षकाकडून आणि पालकांकडून तिला बोलले जात होते. त्यामुळे या लहान वयात अपेक्षा ही नैराश्यात गेली होती. अखेर आपले जीवन संपविण्याचा निर्णय अपेक्षाने घेऊन शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी सुसाईड नोट लिहून सायंकाळी सहा वाजता घर सोडून निघून गेली. मुलगी सुसाईड नोट लिहून गेल्याचे कळल्यावर मारभळ कुटुंबांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शैलेश सणस याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रेयजाधव, पोसई अभिजित पाटील, मपोह जोस्ना मासे, पोना प्रगती खिचडे, पोशी हर्षल पाटील, पोना अनिल पाटील व मपोशी बुखारी यांची ०२ शोध पथके तयार केली. पेण, रोहा, पनवेल रेल्वे स्टेशन येथे संपर्क साधून सदर मुलीचे फोटो व माहिती पाठवून फोनद्वारे कल्पना देण्यात आली.
सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा रक्षक दल अलिबाग व वरसोली येथील कोळीवाड्यातील पोलीस मित्र यांना सदरची माहिती शेअर करण्यात येऊन आपआपल्या हद्दीत शोध घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे या शोध पथकांना अलिबाग, वरसोली, किहीम बीच, चोंढी, झिराड, मांडवा परिसरात पाठवून शोध घेण्यात आला. रात्रौ २२.५० वाजण्याचे दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे येथून पोलीस अंमलदार देवेन म्हात्रे यांनी फोनवरून नमूद वर्णनाची मुलगी पनवेल एस. टी. स्टॅन्ड येथे मिळून आल्याचे कळविले. ही माहिती मिळताच पथक पाठवून अपेक्षा हिला सुखरूप पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले.