जिल्ह्यात आनंदात 14 हजार गौराईंची स्थापना
By निखिल म्हात्रे | Published: September 22, 2023 06:28 PM2023-09-22T18:28:18+5:302023-09-22T18:29:41+5:30
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात.
अलिबाग : अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते. शुक्रवारी सकाळीच गौराईची विधीवत पूजन करून तिची दिड दिवसाची स्थापना करण्यात आली.
जिल्ह्यात आज 14 हजार गौराईंची प्राणपतिस्थापना झाली आहे. गौराईच्या नैवेद्यासाठी रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तर गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करीत दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत केले गेले.
गौरींच्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखविला गेला. तर उद्या शनिवारी 23 सप्टेंबर 2022 रोजी ज्येष्ठागौरी विसर्जन केले जाणार आहे.