पेण : तालुक्यातील उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या, गावात बाधित रुग्णांना घरातील क्वारंटाइन विलगीकरणासाठी जागेची उणीव या सर्व समस्या पाहून उंबर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांनी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उंबर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमधे १० बेड्सच्या विलगीकरण कक्षाची निर्मिती केली आहे.
ज्या रुग्णांच्या विलगीकरण काळामध्ये घरात जागा नाही अशांसाठी उंबर्डे ग्रामपंचायत सरपंच महेश पाटील यांचा हा स्तुत्य उपक्रम गावातच केल्याने रुग्णांसह नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. सध्या कोरोना महामारी संकट समयी आलेल्या दुसऱ्या लाटेत वेगाने संसर्ग वाढत आहे. रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ज्या ठिकाणी कोविड सेंटर आहेत अशा ठिकाणी नेण्यात येत आहे. तर ज्यांना प्राथमिक स्वरूपात लक्षणे आहेत त्या रुग्णांना क्वारंटाइन पिरीएडमध्ये घरी ठेवले जाते. पण जर त्या रुग्णाला घरात जागेअभावी येणाऱ्या समस्या, घरातील सदस्यांचा घरातील वावर त्यामुळे सर्व कुटुंबाला संसर्गाचा उपद्रव होतो. ही भासणारी कमतरता लक्षात घेऊन अशा परिस्थितीत कोरोनाबाधितांसाठी उंबर्डे ग्रामपंचायतीने १० बेड्सचा विलगीकरण कक्ष सरपंच महेश पाटील यांनी उंबर्डे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तीन दिवसांपूर्वी तातडीने सुरू केला आहे. आता याचा उपयोग कोरोनाबाधित रुग्णांनी करून घ्यावा, असे आवाहन उंबर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश म्हात्रे यांनी केले आहे.