नागोठणे : शहरात रविवारी आलेला पूर, त्याच दिवशी सायंकाळी ओसरण्यास प्रारंभ झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या घरांची तसेच दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा ही स्वच्छता मोहीम राबविली होती. भिजलेला माल तसेच घरातील खराब कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार सकाळपासून कामाला लागल्याने दुपारपर्यंत बहुतांशी बाजारपेठ तसेच कोळीवाडा भाग स्वच्छ करण्यात यश आले होते.पूरग्रस्त भागात नाले तसेच गटारात औषधी पावडर टाकण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रविवारी सायंकाळपासूनच नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी सकाळपासून बाजारपेठेतील दुकानांचे पंचनामे करण्यास प्रारंभ केला असल्याचे येथील महसूल खात्याचे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल यांनी स्पष्ट केले. या महापुरात अनेक दुकानांमधील मालाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून बहुतांश दुकानांमधील मालाचा विमा काढला असला तरी, त्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानीची रक्कम किती मिळेल, हे मात्र सध्या समजू शकलेले नाही. दरम्यान, मोहोल्ल्यातील आयुब मुल्ला यांच्या घरात पाण्याची पातळी १० फूट इतकी होती व त्यात त्यांच्या घरामागच्या दोन भिंती कोसळल्या आहेत.
नागोठणेत लाखोंच्या नुकसानीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:47 PM