अलिबाग : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी शासकीय यंत्रणा लावणे अडचणीचे आहे. त्यामुळे कंपनीच्या सामाजिक दायित्वतून उमटे धरणातील गाळ काढण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी यांना केली आहे. याबाबत बुधवारी गेलं, आर सी एफ कंपनी सोबत बैठक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. उमटे धरणासाठी १४१ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहितीही अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. तर काहीजण स्वखर्चाने गाळ काढणार आहेत त्याचे मी स्वागत करतो असेही आमदार दळवी म्हणाले आहेत.
उमटे धरणाचा गाळ प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. याबाबत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मंगळवारी १४ मे रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन धरणाबाबत माहिती दिली. धरण हे १९७८ ला बांधले असून त्यानंतर गाळ काढण्यात आलेला नाही आहे. गेल्यावर्षी जल संधरण विभागातर्फे गाळ काढण्यासाठी यंत्रणा लावली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने गाळ काढण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत हे खरे आहे असे आमदार दळवी म्हणाले.
अलिबाग मधील आर सी एफ आणि गेलं कंपनीच्या सामजिक दायित्व मधून गाळ काढावा अशी सूचना प्रशासनाला केली आहे. याबाबत कंपनी सोबत आज बुधवारी बैठक जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून गाळ काढण्यास सुरुवात होईल. धरणासाठी १४१ कोटी निधी शासनाने मंजूर केला आहे. यामध्ये धरणाचे बांधकाम, नवीन वॉल बसवणे ही कामे केली जाणार आहेत. अशी माहिती दळवी यांनी दिली आहे. तसेच काहीजण स्वखर्चाने गाळ काढणार असल्याचे म्हणत आहेत यासाठी मीही हातभार लावण्यास तयार असल्याचेही दळवी यांनी म्हटले आहे.