१२०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन
By Admin | Published: July 16, 2017 02:46 AM2017-07-16T02:46:45+5:302017-07-16T02:46:45+5:30
मुंबई विद्यापीठाने यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राध्यापकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : मुंबई विद्यापीठाने यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राध्यापकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी कधी इंटरनेट बिघाड तर कधी वीजपुरवठा खंडित, कधी सर्व्हर डाउन आदी अडचणींवर मात करीत मोबाइलचे हॉटस्पॉट जोडून आतापर्यंत प्रत्येकी बाराशे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी यंदापासून आॅनलाइन असेसमेंटद्वारे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व्हर डाउन, चुकीच्या उत्तरपत्रिका, प्राध्यापकांची नोंदणी न होणे आणि इतर अनेक तांत्रिक त्रुटींमुळे ही प्रक्रि या चर्चेत राहिली आहे. मात्र, नेरळ येथील मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालयातील प्रा. सागर शशिकांत मोहिते आणि कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या कर्जत महाविद्यालयातील प्रा. राहुल सुतार यांनी मोबाइल हॉटस्पॉटवर विद्यार्थ्यांचे पेपर तपासून अनुभवी प्राध्यापकांना आदर्श घालून दिला.
विशेष म्हणजे, काही अनुभवी प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना दोन आकडी संख्याही गाठली नाही. जून महिन्यात परीक्षांचा निकाल लागतो. मात्र, यंदा जून महिन्यात उत्तरपत्रिका मूल्यांकन करण्याची सुरुवात झाली तीसुद्धा नवीन पद्धतीने. या पद्धतीत अनेक अडचणी आल्याने प्राध्यापक वर्ग वैतागला, त्यामुळे वेळेत निकाल लागला नाही.