११ वर्षांनंतरही दरडग्रस्तांना पत्र्याच्या शेडचाच आधार
By admin | Published: July 26, 2016 04:57 AM2016-07-26T04:57:40+5:302016-07-26T04:57:40+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते
दासगाव : संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली होती तर अनेक गावातील हद्दीमध्ये दरडीही कोसळल्या होत्या. आजही गावोगावी कोसळलेले डोंगर महाडकरांच्या मनात दरडीच्या आठवणी ताज्या आहेत. जुई, कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये सामाजिक संस्थांनी दरडग्रस्तांना आधार दिला आणि त्यांची घरे उभी राहिली. मात्र दासगावमधील दरडग्रस्त ११ वर्षानंतरही पत्राशेडमध्ये राहण्याच्या नरकयातना भोगत आहेत.
२००५ मधला २५ जुलै हा दिवस महाडकरांसाठी काळ्या दिवसाप्रमाणे उगवला. दिवस-रात्र पावसाच्या धारा कोसळत होत्या. या कोसळणाऱ्या पावसात एकमेकांशी होणारा संपर्क तुटला होता. जलमय महाड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला होता. महाड शहरात १० ते १५ फुट पुराचे पाणी साचले होते. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आणि २५ जुलैच्या संध्याकाळी डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांसाठी मात्र काळरात्र ठरली. पुराचा जोर कायम असतानाच रात्रीत दासगांव, जुई, रोहन, कोंडीवते या गावांमध्ये दरड कोसळली. या दरडीखाली १९० निष्पाप ग्रामस्थ गाडले गेले. दरडीखाली बेपत्ता झालेल्या मृतांना दरडग्रस्तांना भावना व मृतदेहाची होणारी विटंबना लक्षात घेवून शासनाने न सापडलेल्या ग्रामस्थांना मृत जाहीर केले. सव, कोथेरी, जंगमवाडी, चोचिंदे, करंजखोल दाभोळ आदि गावांमध्ये रहिवाशी वस्तीला दरडीचा धोका निर्माण झाला होता. पुराचा आणि दरडीने महाडमध्ये हाहाकार माजवला होता. दानशूर नागरिक आणि सामाजिक संस्थांनी महाडसाठी मदतीचे दरवाजे खुले केले होते. जनकल्याण ट्रस्टने दासगाव आदिवासी वाडी, कोंडीवते, कुर्ला दंडवाडी आणि रोहन, जुई या गावामध्ये जनकल्याण ट्रस्ट, लालबागचा राजा ट्रस्ट, प्राईड इंडिया आदि सामाजिक संस्थांनी या दरडग्रस्तांसाठी घरे बांधून दिली. मात्र शासनाने मृतांच्या परिजनांना दिलेली मदत आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पत्रा शेडव्यतिरिक्त काहीच दिले नाही. यामुळे आजही दासगांव दरडग्रस्त पक्क्या घरांच्या प्रतीक्षेत पत्राशेडच्या निवाऱ्यामध्ये जीवन कंठीत आहेत.
दरड कोसळून उजाड झालेले डोंगर, जुई दासगाव, कोंडीवते या गावामधील बोडके झालेले डोंगर आजही या दरडीची आणि दरडीखाली गाडले गेलेल्या परिजनांच्या आठवणी २६ जुलै उजाडला की ताज्या होतात. (वार्ताहर)
‘जनकल्याण’ची मदत
जुई, कोंडीवते, दासगाव आणि रोहन या गावामध्ये सुमारे १४२ घरे बांधून दिली. ज्या गावांना अपेक्षित होते त्या गावांमध्ये निर्मल निकेतन कॉलेज आॅफ सोशल वर्क मुंबई येथून समाजसेवेच्या विद्यार्थ्यांकडून आणि जनकल्याणच्या कार्यकर्त्यांमार्फत तालुक्यातील बाधीत गावांचा सर्व्हे करु न मदत पोहोचविण्यात आली.
दासगांवच्या या दरडग्रस्तांसाठी मागील दोन महिन्यांच्या दरम्यान शासनाने घरांसाठी जागा दिली आणि ९० हजार रुपये घर बांधण्यासाठी देण्याचे आश्वासन दिले. मात्र घर बांधणीचे हे पैसे आजही दासगाव दरडग्रस्तांना मिळाले नाहीत. यामुळे दासगाव दरडग्रस्त शासनाच्या उदासीनपणामुळे तात्पुरत्या पत्रा शेडमध्ये राहत आहेत.