मृत्यूनंतरही रक्ताच्या नात्याने अंत्यसंस्काराकडे फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:49 PM2021-04-30T23:49:27+5:302021-04-30T23:49:32+5:30
पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांकडून होत आहेत अंत्यसंस्कार
कळंबोली : कोरोना महामारीमुळे अनेक नात्यांत दुरावा निर्माण होत आहे. मृत्यू झाल्यास अनेक ठिकाणी नातेवाईक समोर येत नाहीत. अंत्यसंस्काराला पाच व्यक्ती तरी सरासरी राहतात, पण कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी नाकारण्याच्या आतापर्यंत पनवेल परिसरात १० घटना घडल्या आहेत. तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
गतवर्षापासून कोरोनाचा कहर कायम आहे. वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनामुळे अनेकांत दुरावा निर्माण झाला. पूर्वी एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले की अंत्यसंस्काराला हजारो लोकांची उपस्थिती असायची. आता तशी शासनाकडून परवानगीदेखील नाही. त्यामुळे अनेकांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आपल्यालाही संसर्ग होईल या भीतीने अनेक जण येत नाहीत.
पनवेल महापालिका क्षेत्रात अमरधाम आणि पोदी स्मशानभूमीत शवदाहिन्यांद्वारे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती येत आहेत. पण ज्यांचे काेणीच नाही त्यांचे मात्र कर्मचारीच नातेवाईक बनत आहेत. आश्रमात राहणाऱ्या व्यक्ती, परप्रांतीय व्यक्तींचे मृत्यू झाल्यास नातेवाईक येत नाहीत, त्यामुळे पालिका कर्मचारीच अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. कोरोनाच्या काळात नात्यांतील जिव्हाळा किती रुक्ष झाला आहे याचा अनुभव अंत्यविधी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून येत आहे.
पाच जणांना परवानगी; काही मृतांच्या नशिबी तेही नसल्याची स्थिती
कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास पीपीई किट घालून पाच जणांना अंत्यसंस्काराला परवानगी दिली जात आहे. पण, कित्येक जणांना आपल्या रक्तातील पाच जणही मिळत नाहीत. शेवटी स्मशानभूमीतील कर्मचारीच नातेवाईक बनून अंत्यविधी करीत असल्याचे चित्र आहे. अंत्यविधी करता-करता कर्मचारी हतबल झाले आहेत. काळजी घ्या, घरीच राहा आणि कोरोनाला कुठेतरी थांबवा, अशी भावना ते व्यक्त करीत आहेत.