मधुकर ठाकूर
उरण : घारापुरी बेटावरील खंडित झालेला वीजपुरवठा अथक प्रयत्नांनंतर ३५ दिवसांनी सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची मालिका सुरूच आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबतच्या सुचना देण्याची आणि छोट्या - मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरण विभागाकडे तक्रारीव्दारे केली आहे.
घारापुरी ऐतिहासिक बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या २०० केव्हीए क्षमतेच्या समुद्राच्या पाण्याखाली टाकण्यात आलेल्या सब मरीन केबल्स जहाजांच्या ॲकरिंगमुळे ठिकठिकाणी नादूरुस्त झाल्या होत्या. त्यामुळे बेटावरील राजबंदर,शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील विद्युत पुरवठा २६ जुनपासुन ३५ दिवस खंडित झाला होता. दरम्यान तब्बल ३५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर महावितरण विभागाने घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त २०० केव्हीए सबमरिन केबल्सची दुरुस्ती केली आहे.यामुळे ३५ दिवसांपासून बेटावरील खंडित झालेला वीजपुरवठा २७ जुलै पासून सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही तकलादू पध्दतीने आणि घिसाडघाईने झालेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
तासनतास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका येथील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील ग्रामस्थांबरोबरच छोट्या - मोठ्या व्यावसायिकांनाही बसत आहे.व्यावसायिंकांना नाहक आर्थिक नुकसानचा सामना करावा लागत आहे. तसेच ग्रामस्थ वग्रामपंचायतीला वीज, पाणी या दोन्हीही संकटांचा सामना करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत पनवेल येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तीनवेळा पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत सुचना देण्याची आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरण विभागाकडे तक्रारीव्दारे केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.