लाईट गेले तरी महावितरणचे अधिकारी करतात चालढकल; नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:38 AM2023-07-10T06:38:34+5:302023-07-10T06:38:43+5:30
अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे सांगितले
पनवेल - महावितरणचे अधिकारी वीजपुरवठा खंडित झाल्यावर कशा प्रकारे चालढकल करतात. याबाबतच्या तक्रारींचा पाढाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी(दि. ८) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलेल्या बैठकीत नागरिकांनी वाचला.
या दृष्टीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी महावितरणतर्फे लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असून, त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.
पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सतीश सरोदे व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल मनपा माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होते.
वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढीव देयके, मीटर बदलताना घेतले जाणारे पैसे, कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे, वीज गेल्यानंतर फोन न उचलणे अशा विविध समस्यांच्या अनुषंगाने बैठकीत अनेकांनी तक्रारी केल्या. महावितरणच्या कार्यालयात सीसी टीव्ही बसवा म्हणजे कोण खोटे बोलते ते समजेल असेही सुचविण्यात आले.
लोकांनी किती वाट पाहायची?
अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे सांगितले; पण टोल फ्री नंबरवर अनेक वेळा व्यस्त असतो. तुम्ही लाईनवर आहात, अशी टेप वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांनी किती वेळ वाट पाहायची ते सांगा. त्यासाठी काही तरी उपाययोजना करण्यास सुचविले.