३१ मार्च उलटला तरी नेरुळ-उरण मार्गावर लोकल धावलीच नाही, डेडलाईन्स पुन्हा हुकल्याने उरणकरांच्या आनंदावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:48 PM2023-03-31T23:48:22+5:302023-03-31T23:48:38+5:30

Raigad News: या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.

Even though 31st March has passed, the local has not run on Nerul-Uran route, as the deadlines have been missed again, the happiness of Urankars has faded. | ३१ मार्च उलटला तरी नेरुळ-उरण मार्गावर लोकल धावलीच नाही, डेडलाईन्स पुन्हा हुकल्याने उरणकरांच्या आनंदावर विरजण

३१ मार्च उलटला तरी नेरुळ-उरण मार्गावर लोकल धावलीच नाही, डेडलाईन्स पुन्हा हुकल्याने उरणकरांच्या आनंदावर विरजण

googlenewsNext

- मधुकर ठाकूर
उरण : या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.वारंवार डेडलाईन्स बदलल्या नंतरही ३१ मार्चच्या दिवसभरात नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर रेल्वे धावलीच नाही.तर करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित  झाले नसल्याने हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यासाठी उरणकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.यामुळे मात्र उरणकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आणखी विलंब होणार असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा लागुन राहीली आहे.१७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग  उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा   आहे.प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते.मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून  नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे.त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पुर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या.

फेब्रुवारी नंतर मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी या मार्गावर ट्रायलरनही घेण्यात आली होती.सुरक्षा चाचण्यादरम्यान  रेल्वे एका दिवशी पहाटेच थेट उरण स्थानकातच  मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी खुणगाठ उरणकरांनी बांधली होती.मात्र ३१ मार्चच्या शुक्रवारी दिवसभरात तरी रेल्वे या मार्गावर धावलीच नाही. यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.बहुतांश मोठी कामे पुर्णत्वास गेलेली आहेत. तरी महत्त्वाची अनेक किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आणखी वेळ लागणार आहे.यामुळे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात विलंब होणार असल्याची कबुली मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.मात्र प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा आणि एक हजार मच्छीमार बोटी लॅण्डींगची क्षमता असलेला करंजा मच्छीमार बंदराचे काम मागील दहा वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे. ६५ कोटी खर्चाचे काम विलंबामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे १५० कोटींच्या घरात गेले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर उभारण्यात येत असलेल्या या बंदराच्या कामासाठी निधी कमी पडला होता. त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यासाठी ३५ कोटींचा अतिरिक्त निधीचा बुस्टर डोसही देण्यात आला आहे.त्यानंतर कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.त्यामुळे करंजा मच्छीमार बंदराचे कामही मार्च २०२३ अखेरीस पुर्ण होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने केली होती.त्याआधी दोन वर्षापुर्वी २८ ऑक्टोबर २०२०  तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी करंजा बंदराच्या भेटी दरम्यान मार्च २०२३ पर्यंत बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती.मात्र निर्णय वेगवान ,गतिमान महाराष्ट्र सरकारच्या डेडलाईन्स तुर्तास तरी कागदावरच  आहेत.समुद्राच्या भरती-ओहटी आणि त्यामुळे उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे कामे पूर्ण करण्यासाठी विलंब झाला आहे.मात्र मच्छीमार बंदर 
 कार्यान्वित करण्यासाठी आणखी दीड दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी सांगितले. मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा झालेल्या दोन्ही प्रकल्पांची हेडलाईन्स पुन्हा हुकल्यामुळे मात्र उरणकरांच्या 
आनंदावर विरजण पडले आहे.

Web Title: Even though 31st March has passed, the local has not run on Nerul-Uran route, as the deadlines have been missed again, the happiness of Urankars has faded.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.