- निखिल म्हात्रे
अलिबाग : शासनाने पीओपी मूर्तींवर अद्याप बंदी घातली नसली तरी गेली काही वर्षे गणेशभक्तांचा कल पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे वाढत आहे. परिणामी महाग असूनही शाडूच्या मूर्तींना मागणी वाढत आहे. कारखानदारांच्या मते यंदा ३० टक्के शाडूच्या मूर्तींना मागणी आहे.
गणेशोत्सव जवळ आला असून, कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. कच्च्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून, रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशभक्तांची पावले आता मूर्ती कारखान्यांकडे वळत असून, ते नोंदणी करत आहेत. आपल्याला हव्या असलेल्या गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी भक्त करत असल्याचे चित्र दिसून येते.
जिल्ह्यातील गणेशभक्तांमध्येही पर्यावरणविषयक जागृती होत असल्याचे आश्वासक चित्र आहे. काही गणेशभक्त कारखान्यांमध्ये आपल्याला शाडूच्या मातीपासूनच बनविलेली गणेशमूर्ती हवी, अशी मागणी करत आहेत. यामुळे कारखानदारांनाही शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवाव्या लागत आहेत. यावर्षी जिल्ह्यात जवळपास ३० टक्के नागरिकांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची मागणी केली आहे.
पीओपीची मूर्ती स्वस्त का? वजनाने हलके व शाडूच्या मातीपेक्षा पीओपी स्वस्त आहे. तसेच शाडूच्या मातीपासून गणपतीची कच्ची मूर्ती बनविण्यासाठी तसेच मूर्तीचे कोरीवकाम करण्यासाठी एका कारागिराला दोन दिवस जातात. तर पीओपीपासून एका दिवसात एक कारागीर दोन मूर्ती तयार करतो. पीओपीची मूर्ती सुकविणे शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा सोपे जाते. पीओपीच्या मूर्तीची आखणी करणेही शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा सोपे आहे.
शाडूच्या मातीच्या मूर्ती महाग असल्याने गणेशभक्तही मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती खरेदी करतात. मात्र, काही गणेशभक्त आता शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची मागणी करत असून, ती वाढली आहे. त्यांच्यासाठी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत. - नितीन पेडणेकर, मूर्तिकार