अखेर धोत्रेवाडी विहीर आदिवासींसाठी खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:17 AM2018-05-21T06:17:20+5:302018-05-21T06:17:20+5:30
मागील वर्षी सदर विहीर असलेली जमीन वासुदेव पाटील यांनी खरेदी केली आणि नंतर संपूर्ण जागेला कुंपण घातले.
कर्जत : तालुक्यातील धोत्रेवाडी येथील पाण्याच्या विहिरीला तारेचे कुंपण घालून पाणी देण्यात हरकत घेतली होती.त्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेत धोत्रेवाडी विहिरीला घातलेले कुंपण खुले करण्याचे आदेश दिले.
धोत्रेवाडी या टेंबरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावात असलेली पाण्याची विहीर खासगी जागेत पूर्वी बांधली होती. मागील वर्षी सदर विहीर असलेली जमीन वासुदेव पाटील यांनी खरेदी केली आणि नंतर संपूर्ण जागेला कुंपण घातले. त्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण होताच धोत्रेवाडीमधील महिला त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता पाटील यांनी विहिरीवर येण्यास बंदी घालून शिवीगाळ केली होती. त्यामुळे आदिवासी संघटनेने कर्जत तहसीलदार यांना १७ मे रोजी पत्र पाठवून विहीर खुली न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी तत्काळ विहीर अधिग्रहण करून खुली करण्याचे आदेश कर्जत तहसील कार्यालयाला दिले. तहसीलदार अविनाश कोष्टी, मंडळ अधिकारी पी. पी. नवाळे यांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासह धोत्रेवाडी येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करून विहीर आदिवासींसाठी खुली केली.