दरवर्षी भारतीय पचवतात १ लाख ३४ हजार कोटींची औषधे- महेश झगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:53 PM2019-09-25T22:53:33+5:302019-09-25T22:53:53+5:30
धारकर महाविद्यालयाच्या वतीने ‘जागतिक फार्मासिस्ट डे’चे आयोजन
कर्जत : चौथी औद्योगिक क्रांती येणार आहे. आॅनलाइन फार्मसी धोकादायक ठरू शकते. ते रुग्णांनाही अडचणीचे ठरेल कारण त्यांना औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता आहे. आॅनलाइन पद्धतीमुळे मादक औषधांचा दुरुपयोग होऊन व्यसनाधीनतेची भीती आहे तसेच गर्भपाताचे किट उपलब्ध होऊन त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १३५ कोटी असली तरी दरवर्षी चारशे कोटी रुग्ण औषधे खरेदी करतात. त्यामुळे एकवीस हजार कोटी रुपयांचा नफा फार्मसी व्यवसायात होतो. विशेष म्हणजे एक लाख चौतीस हजार कोटी रुपयांची औषधे दरवर्षी भारतीय पचवतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी दिली.
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट डेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. झगडे म्हणाले, १९४७ मध्ये भारतीयांचे आयुर्मान सरासरी ३२ वर्षे होते आता ते ६९ वर्षे आहे. यामागे आपल्या सर्व फार्मासिस्टचे योगदान आहे. देशातील आठ लाख फार्मसीमध्ये आठ लाख फार्मासिस्ट आहेत. काही ठिकाणी फार्मासिस्ट जागेवर नसतात. खरे तर अॅपरन घालूनच फार्मासिस्टने दुकानात उपस्थित रहावे, असे सूचित केले.
प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात, फार्मासिस्ट झाल्यावर रुग्णाला दैवत मानून त्याच्यासाठी देवदूत म्हणून त्याला सेवा देणे अंगीकारावे. अजूनही आपल्याकडे अशिक्षित रुग्ण येत असतात. त्यांना औषधाच्या वेळा व मात्रा कशा द्याव्यात हे समजावून सांगून औषधांचे दुष्परिणाम आवर्जून सांगावेत, असे स्पष्ट केले. देबेश दास यांनी, ज्याप्रमाणे औषध उत्पादनात आपल्या देशाची प्रगती होत आहे त्यावरून येत्या पाच वर्षात भारतीय औषध व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना मेहनत घेणे हे प्रत्येक फार्मासिस्टचे काम आहे, असे स्पष्ट सांगितले. याप्रसंगी फार्मसी कन्सल्टंट ब्रिज सारडा, गुफिक लॅबरोट्रीजचे अध्यक्ष देबेश दास, अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहायक आयुक्त साहेबराव साळुंखे, रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील आदी उपस्थित होते. रायगड, औरंगाबाद, बुलढाणा, सिन्नर, नागपूर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आदी जिल्ह्यातून फार्मासिस्ट शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.