अलिबाग : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात येणारी वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकांकरिताच्या राज्य पात्रता परीक्षेचे तसेच केंद्रीय विद्यालयाच्या ग्रंथपाल परीक्षेचे आयोजन एकाच दिवशी आणि तेही येत्या ६ सप्टेंबर रोजी गोपाळकाल्याच्या ऐन गर्दीच्या दिवशी केली असल्याने हा दिवस परीक्षार्थींकरिता अत्यंत गैरसोयीचा असल्याने त्यात बदल करण्यात यावा, अशी विनंती काही परीक्षार्थींनी विद्यापीठास ई-मेलद्वारे केली आहे.मुळात विद्यापीठाने ३० आॅगस्ट २०१५ रोजी सेट परीक्षा आयोजित केली होती परंतु नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा गर्दीचा विचार करून राज्य पात्रता परीक्षा ६ सप्टेंबर रोजी आयोजित करताना गोपाळकाल्याच्या गर्दीचा विचार केला गेला नाही, अशी वस्तुस्थिती येथील एक परीक्षार्थी नरेंद्र विजय पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे. याच दिवशी केंद्रीय विद्यालयाच्या ग्रंथपाल परीक्षेचेही आयोजन केले आहे. परिणामी दोहोपैकी कोणत्याही एकाच परीक्षेस परीक्षार्थीस संधी मिळू शकणार आहे, हा या दिवसाचा आणखी एक तोटा पाटील यांनी सांगितला.मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरात होणाऱ्या या परीक्षेच्या दिवशी गोपाळकाल्याच्या सणामुळे मोठी गर्दी व वाहतुकीत बदल केलेले असतात. परिणामी धामधूम व गर्दी यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचणे प्रसंगी शक्य होणार नाही. परिणामी परीक्षा आयोजकांनी या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून परीक्षांच्या तारखांमध्ये योग्य तो फेरबदल करावा, अशी विनंती परीक्षार्थींची असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. (विशेष प्रतिनिधी)
गोपाळकाल्याच्या दिवशी ‘सेट’ची परीक्षा
By admin | Published: August 18, 2015 2:52 AM