किल्ले रायगड परिसरात उत्खनन, वनविभागाने थांबविले काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:48 AM2020-12-10T01:48:35+5:302020-12-10T01:50:41+5:30
Raigad News : किल्ले रायगड परिसर हा वनसंपदेमुळे परिपूर्ण आहे. अशा वन परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन सुरू आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव : किल्ले रायगड परिसर हा वनसंपदेमुळे परिपूर्ण आहे. अशा वन परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन सुरू आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि पर्यावरणाला होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या जमिनीशेजारीच हे उत्खनन सुरु असल्याने हे काम सध्या थांबवले असल्याचे वनविभागाच्या वनपालांनी सांगितले.
किल्ले रायगड हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. घनदाट वनांनी व्यापलेला परिसर आज रायगड संवर्धनाच्या कामात मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नेवाळी परिसरात रायगड संवर्धनासाठी लागणाऱ्या दगडासाठी उत्खनन केले जात आहे. याकरिता या जमिनीवर यांत्रिक साधनांचा वापर करून उत्खनन केले जात आहे. यातील दगड काढून मूळ जमीन मालकाला सपाटीकरण करून देण्याचे ठरले असल्याचे येथे काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितले. किल्ले रायगडाच्या वाघोली खिंड आणि हिरकणीवाडी दरम्यान हे उत्खनन होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड महसूल, वनविभागाकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर महसूल विभाग जागा झाला आहे. महाड महसूल विभागाच्या तलाठ्यांनीही या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केल्याचे तलाठी ए. एस. महाडिक यांनी सांगितले.'
वनविभागाची जमीन याच उत्खनन होत असलेल्या जमिनीला लागून वरील बाजूने आहे. यामुळे वनविभागाची जमीनही धोक्यात आली आहे. वनविभागानेङई तक्रारीची दखल घेत पाहणी केली आणि हे काम थांबवले असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यावेळी उत्खनन करण्यास सुरुवात केली त्यावेळी वनविभागाला सांगणे अपेक्षित होते. मात्र, वनविभागाला न कळवताच काम सुरू केल्याने वनविभागाची जमीन अडचणीत आली आहे. हे उत्खनन करताना संबंधित ठेकेदाराने जेसीबी आणि ट्रॅक्टर इत्यादी यांत्रिक साधनांचा वापर केला आहे. या उत्खननामुळे किल्ले रायगडचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी उत्खनन केले आहे त्या ठिकाणी अतिउच्च दाबाच्या तारांचा टाॅवर उभा आहे. शेजारील माती खणून काढल्याने या टाॅवरलाही धोका निर्माण झाला आहे.
किल्ले रायगड परिसरात नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. ज्या भागात उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी वनविभागाची जागा आहे, अथवा नाही याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच कार्यवाही केली जाईल.
- प्रशांत शिंदे, वन अधिकारी, महाड
रायगड किल्ल्याजवळ उत्खनन करण्यासाठी एक अर्ज महाड तहसील कार्यालयात दिला आहे. मात्र, किल्ल्याचा परिसर हा संवेदनशील असल्याने आणि उत्खनन करण्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ठरवले जाईल.
– सुरेश काशीद, तहसीलदार, महाड