हुतात्मा कोतवाल मैदानावर खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:14 PM2019-12-19T23:14:24+5:302019-12-19T23:14:27+5:30
दीडशे वर्षे जुने व्यायाममंदिर : परवानगी नसताना विश्वस्तांकडून काम सुरू; अकरा जणांवर गुन्हा दाखल
संजय गायकवाड।
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आहे. त्याच्या समोरील मैदानावर बांधकाम करून दुकान गाळे काढण्याचा घाट व्यायाम मंदिर विश्वस्त मंडळाने घातला होता. मात्र कर्जतमधील नागरिक आणि नाभिक समाजाच्या वतीने हा डाव उधळून लावला आहे. विश्वस्त मंडळाने मैदानावर अचानक काम सुरू केल्याने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणारे व नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे हे काम बंद पाडले आहे. हुतात्मा कोतवाल मैदानावर परवानगी नसताना खोदकाम करणाऱ्यांविरोधात मंगळवार, १७ डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या वतीने तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील हृषीकेश जोशी यांनी, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित कार्यालयांत पत्र पाठविले आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर १७४/१९ मधील मैदान शासनाने हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर संस्थेस वापरण्यास दिले असून सुमारे १५० वर्षांपासून ते वापरात असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याबाबत कार्यालयास विविध वेळी पुरावे, पत्र व नोटीस देण्यात आल्या आहेत. मैदानाच्या जागेवर बांधकाम करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे कर्जत नगर परिषद कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एमआरटीपीच्या तरतुदीनुसार संबंधितांवर २ दिवसांच्या आत गुन्हा नोंदवावा, असे नमूद केले होते. मात्र तरीही २ डिसेंबर रोजी सदर मैदानावर विश्वस्त मंडळाच्या सांगण्यावरून, ठेकेदाराने मजुरांच्या व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले. याबाबत अॅड. हृषीकेश जोशी यांनी संबंधित कार्यालयांना कळविले होते. नाभिक समाजाचेही पत्र देऊन काम बंद करण्याचा इशारा दिला होता. जोशी यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, मात्र प्रशासन विश्वस्त मंडळावर कोणतीच कारवाई करीत नसल्याने अखेर जोशी यांनी आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. दरेकर यांनी १३ डिसेंबर रोजी लक्षवेधी सूचना टाकली आणि मग संबंधित प्रशासनाचे डोळे उघडले. खोदकामाची तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने पोलीस ठाण्यात विश्वस्त मंडळाविरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या लेखी आदेशान्वये साहाय्यक लक्ष्मण माने यांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर सिटी सर्वे नंबर १७४/ २०१९ मध्ये असलेले जुने व्यायाम मंदिर जीर्ण झाले असल्याने त्याचे नव्याने बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती, त्या वेळी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिराच्या अध्यक्षांनी सादर केलेल्या कागदपत्रे आणि नूतनीकरण परवानगीसाठी सादर केलेल्या नकाशात धर्मदाय सहआयुक्त, मुंबई यांना तफावत आढळली. त्यामुळे १३ मे २०१९ रोजी नूतनीकरणाची बांधकाम परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबतचे रिफ्युज पत्र हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिराच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे, त्यानंतर १५ जून २०१९ रोजी पुन्हा नूतनीकरणाच्या परवानगीसाठी नव्याने अर्ज करण्यात आला. त्याच दरम्यान मैदानात बांधकाम करू नये म्हणून कर्जत नगर परिषद तसेच इतर कार्यालयांनाही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी परदेशी यांनी तोंडी स्थगिती आदेश दिले होते. बांधकाम परवानगी नाकारल्याबाबत व्यायाम मंदिराच्या अध्यक्षांना २५ नोव्हेंबर रोजी लेखी कळविण्यातही आले होते.
च्मात्र तरीही २ डिसेंबर रोजी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हरिभाऊ दुर्गे यांनी व त्यांच्या समितीवर असलेले सचिव-शंकर अण्णा भिंगारे, खजिनदार-उदय विनायक मांदुस्कर, विश्वस्त - अविनाश बाळकृष्ण बडेकर, गणेश नंदकुमार ढमाले, रमेश नारायण देशमुख, शिवाजी राम भासे, मोरेश्वर गणपत देशमुख, शशिकांत शिवाजी कडव, संजय नेताजी बडेकर, सुनील हरिभाऊ दुर्गे या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी नगर परिषदेची बांधकाम करण्याची कोणतीही परवानगी नसताना व्यायाम मंदिराच्या मोडकळीस आलेल्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत खड्डे खोदले आणि लाकडी कुंपण करून अवैद्य बांधकाम चालू केले.
च् खोदकामाची तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने पोलीस ठाण्यात विश्वस्त मंडळाविरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या लेखी आदेशान्वये रचना साहाय्यक लक्ष्मण माने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.