खालापूरमध्ये वाहनतळासाठी उत्खनन
By admin | Published: December 8, 2015 12:53 AM2015-12-08T00:53:53+5:302015-12-08T00:53:53+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत
खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजित ट्रक टर्मिनलच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले जात असून माती उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत खालापूरचे प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांनी दिले आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. कळंबोली ते किवळे या ९४ किमीच्या अंतरात अवजड वाहनांना थांबण्यासाठी जागा नसल्याने खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाहनतळ प्रस्तावित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनतळांचे काम खाजगी कंपन्यांना बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर दिले आहे. या कंपन्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला वाहनतळ उभारून दिल्यानंतर काही वर्षासाठी वाहनतळाचा ताबा खाजगी कंपन्यांकडे राहणार आहे. त्यातून येणारे उत्पन्न खाजगी कंपन्यांना मिळणार असून शासनाने तसा करार केला आहे.
वाहनतळासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. मात्र महसूल विभागाकडून उत्खनन करण्यासाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. खाजगी जागेत उत्खनन करताना परवानगी घेवून शासनाला रॉयल्टी भरावी लागते. मात्र ज्या खाजगी कंपनीने सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे, त्या कंपनीने परवानगी घेतली नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. शिवाय रॉयल्टीही भरली नसल्याने हे काम वादात सापडले आहे. मुख्य म्हणजे एक्स्प्रेसवेच्या बाजूला सुरू असलेल्या या कामाची माहिती महसूल विभागाला नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.